'..तर मी 'त्या' मंत्र्यांचे नाव फडणवीस अन् शिंदेंच्या कानावर घालेन' अजित पवारांचा नितेश राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:39 IST2025-03-22T13:33:38+5:302025-03-22T13:39:50+5:30

नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा काम सर्वांचेच आहे. सरकारचा जास्त आहे.

pune aurangzeb tomb controversy If my ministers do it, I will tell them but. Ajit Pawar attack on Nitesh Rane | '..तर मी 'त्या' मंत्र्यांचे नाव फडणवीस अन् शिंदेंच्या कानावर घालेन' अजित पवारांचा नितेश राणेंना इशारा

'..तर मी 'त्या' मंत्र्यांचे नाव फडणवीस अन् शिंदेंच्या कानावर घालेन' अजित पवारांचा नितेश राणेंना इशारा

पुणे - राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून आला आहे. तर विरोधकांकडून टीका टिपणी केली जात आहे. अशातच आमदार नितेश राणेंनी औरंगजेबच्या कबरीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कबर पाकिस्तानात पाठवून द्या असं राणे म्हणाले आहेत. शिवनेरी किल्यावर शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने राणें यांनी केलेल्या विधानावर वरून राजकीय वातावरण तापले असून  त्यांच्या या विधानावर मविआतील नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. तर आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी त्यांना समज दिली असती असं म्हणत नितेश राणेंना टोला लगावला आहे.  



अजित पवार म्हणाले, 'मी त्याबद्दल माझी भूमिका स्पष्ट केली आहे. परत परत तेच मुद्दे काढू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह सर्व महापुरुषांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच काम सर्वांचेच आहे. सरकारचे जास्त आहे. माझ्यासहित सर्वांनी हे केलं पाहिजे. माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी त्यांना सांगेन पण दुसऱ्या मंत्र्यांनी बोलले तर फडणवीस आणि शिंदेंच्या कानावर घालेन' असं म्हणत त्यांनी इशारा दिला.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे

सगळ्यांची भावना एकच आहे. ही पण जोरात साजरी व्हावी. अशी समस्त हिंदू समाजाची इच्छा आहे. ती सरकारपर्यंत आम्ही नक्की पोहोचवण्याचं प्रयत्न करू. औरंगजेबाच्या कबरीबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, आज हिंदू समाजाची भावना हीच आहे. आज महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवलं. त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. काही लोकांना ती मोठी आठवण वाटते. ती आम्हाला हिंदू समाज म्हणून नको आहे. कोणाला ती पाहिजे असेल तर पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं. तीच भावना मी आज व्यक्त केली आहे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विचारांचे कार्यकर्ते पूर्ण समाज बोलतोय की, ती कबर महाराष्ट्रात नको. ती भावना आपल्याला कळायला हवी. म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत.

Web Title: pune aurangzeb tomb controversy If my ministers do it, I will tell them but. Ajit Pawar attack on Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.