पुणे: ‘‘ते सांगतात औरंगजेब क्रुर होता, यांच्या राजवटीत संतोष देशमुख यांच्या हत्या झाली, स्वारगेटमध्ये बलात्कार झाला, मग यांच्या राजवटीची तुलना त्याच्या राजवटीबरोबर केली यात चूक काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण आपल्या विधानाशी ठाम आहोत, माफी मागणार नाही, असे सांगितले. देशद्रोहाचा गुन्हा लावण्याची धमकी दिली तरीही विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यावर प्रथमच पुण्यात काँग्रेसभवनमध्ये आलेल्या सपकाळ यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले, “शिवत्रपती किंवा कोणत्याही थोर व्यक्तीवर टीका करा व परदेशात पळून जा, इथे असाल तर पोलिस संरक्षण घ्या अशी योजना फडणवीस सरकारने सुरू केली आहे. कोरटकर अशीच टीका करून कलकत्तामार्गे दुबईला गेला. पोलिस काय करत होते? फडणवीस यांनीच पोलिसांना कोरटकरला मदत करण्यास सांगितले. सोलापूरकरने टीका केली तर त्याला पोलिस संरक्षण मिळाले. हे काय प्रकार आहेत? राज्याला गृहमंत्री आहे की नाही? गृहविभागाचे काम कोणी घाशीराम कोतवाल पाहतो का? राज्यातील जनतेला फडणवीस यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.”
एक उपमुख्यमंत्री मला म्हणाले, माफी मागा, नाहीतर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावतो. दुसरे उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलिस याची चौकशी करतील. मी केले तरी काय? औरंगजेब क्रुर होता तुम्हीच म्हणता आहात तर तुमच्या सरकारमध्ये त्याच्यासारखाच क्रुर कारभार सुरू आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीने युवक वर्ग हैराण झाला आहे. आम्ही हे सगळे प्रश्न सरकारला विचारतो आहोत, तर सरकारचे दुसरेच काही सुरू आहे. लाडक्या बहिणींना निवडणुकीआधी सरसकट पैसे वाटले. आता अपात्र म्हणून अनेक बहिणींना योजनेतून बाहेर काढले जात आहे. मग आधी वाटप केलेले पैसे संबधित अधिकाऱ्यांकडून वसूल करणार आहात का? काही कोटी रूपयांची गोष्ट आहे. यांचा सगळा कारभार हा असा असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
संघटनात्मक स्तरावर काँग्रेस पक्ष क्षीण झाला आहे हे सपकाळ यांनी मान्य केले, मात्र आता आम्ही संघटना बांधत आहोत. एक विचाराने एकत्र येत आहोत. ही बांधणी विचारधारेवर आधारित असेल. आमचा लढाही फक्त राजकीय लढा नसेल तर विचारधारेवर आधारितच असेल. लोक पक्षातून जातात हेही खरे आहे, धंगेकर का गेले हे त्यांनीच सांगितले. सत्ता सत्ता आणि सत्ता हेच काहीजणांना हवे असते. आम्ही तीन वेळा उमेदवारी दिली तरीही ते गेले. आता असे होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ असे त्यांनी सांगितले.
पुण्यासारखे सांस्कृतिक शहर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहे. गुजरातमधील कांडला बंदरात हे सगळे नशेचे पदार्थ येतात. कांडला व पुणे असे काही कनेक्शन आहे हे तपासण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे करतो आहोत असे सपकाळ यांनी सांगितले. पुण्यामध्ये नको ते प्रकार व्हावेत हेही पोलिसांचे अपयश असल्याचे ते म्हणाले.