पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुढील पन्नास वर्षे वाहतुकीला काही अडचण निर्माण हाेणार नाही असे आपण म्हणायचाे, मात्र अद्यापही वाहतुक काेंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार असून पुढील सहा महिन्यांत कामाला सुरूवात हाेईल अशी घाेषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे पुणे- मुंबई प्रवास आणखी वेगवान हाेणार आहे.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभियंता दिनी आयाेजित 'सीओईपी अभिमान पुरस्कार' प्रदान साेहळ्यात गडकरी बाेलत हाेते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी उपस्थित हाेते. यंदाचा सीओईपी जीवनगाैरव पुरस्कार ज्येष्ठ उद्याेगपती पी.एन. भगवती यांच्या वतीने लाेहिया यांनी स्विकारला. तसेच अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रविण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, ‘जे.पी माॅर्गन चेस’ च्या सीईओ माेनिका पानपालिया आणि टेस्ला माेटर्सचे वरिष्ठ संचालक ऋषिकेश सगर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने गाैरविण्यात आले.गडकरी म्हणाले, समाजाच्या गरजांवर आधारित संशाेधन करणे आणि त्यातून निर्माण हाेणारी सेवा, वस्तू, उत्पादन सर्वसामान्यांना परवडणारे असले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करणारे आणि निर्यात वाढविणारे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अवलंबावे लागणार आहे.
स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज गरजेचे
कृषी अर्थव्यवस्थेकडे दूर्लक्ष केल्यामुळे शहरातील लाेकसंख्येत भर पडत आहे. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजेत. त्यासाठी कृषी क्षेत्राला पाणी, जंगल, जमीन आणि प्राणी यावर आधारित नवीन तंत्रज्ञानांची जाेड द्यावी लागेल. देशातील ६५ टक्के लाेकसंख्या कृषि अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. गाव, गरीब, मजूर आणि शेतकरी हा समृद्ध हाेत नाही ताे पर्यंत आपल्याला आत्मनिर्भर भारत म्हणता येणार नाही. शेतकरी हा आता केवळ अन्नादाता राहिलेला नसून ताे उर्जादाता झाला आहे. ग्रामीण भागात राेजगार निर्मिती झाली तर कशाला लाेक शहरात येतील ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मी असेपर्यंत विनावाहक कार देशात येणार नाही
समाजाचा विकास आणि गरिबांचे जीवन बदलणारे तंत्रज्ञान पाहिजे. मी जाे पर्यंत आहे ताेवर विनावाहक कार देशात येणार नाही. हे संशाेधन चांगले आहे की वाईट यावरून मला काही देणे घेणे नाही. देशातील २२ लाख लाेकांना राेजगार मिळाला असल्याचेही गडकरी म्हणाले.