बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी (दि. २६) बारामतीत 'न भूतो न भविष्यति'असे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी अवघी बारामती 'अजितदादा जिंदाबाद 'च्या जयघोषाने दुमदुमली. ठिकठिकाणी जेसीबी बकेट मधून अजित पवार यांच्यावर झेंडू आणि गुलाब पाकळ्याचा वर्षाव करण्यात आला .पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करणारे खास मशीन यावेळी मागविण्यात आले होते. मशिनगणमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव कऱण्यात आला.ठीकठिकाणी क्रेनद्वारे सुमारे ५०० किलो फुलांचे हार घालत त्यांचे स्वागत करण्यात आले.
बॅंड पथक, ढोलपथकासह अोपन जीपमधून त्यांची मिरवणूक निघाली.यावेळी पवार यांच्यासमवेत पुत्र पार्थ पवार मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील कसबा येथे पवार यांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मिरवणूकीला सुरुवात झाली. मशिनगणद्वारे संतोष गालिंदे व सहकाऱयांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.मिरवणुकीत पारंपरिक वाद्य आणि डीजे च्या माध्यमातून अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले .नेता खंबीर ...असा करतो विकासाचा वादा... अजितदादा अजितदादा दादा दादा ...हे गाणं सर्वत्र सुरू होते.एकूणच आज अवघी बारामती 'अजितदादामय 'झाली होती. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ, संजीवनी ग्रूप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आदींनी क्रेनद्वारे पवार यांना हार घातले.
व्यापारी मंडळासह स्वागत केले. बारामतीतील सभा व मिरवणूकीचे नियोजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल आदींनी चोखपणे केले.
क्रेन द्वारे हवेत लटकून घातला अजितदादांना हार...अजित पवार यांना हार घालण्यासाठी दहापेक्षा जास्त क्रेन ,तसेच जेसीबी मागविण्यात आले होते.मात्र गुणवडी चौकात एकाने क्रेन च्या मदतीने हवेत लटकत अजित पवार यांना हार घालत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.