बारामती - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या शोकसभेसाठी पोलिस अधिका-यांना निमंत्रीत करण्यासाठी गेलेल्या सीआरएफ जवानास बारामती तालुका पोलिस ठाण्यात बंद खोलीत बेड्या ठोकून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अशोक इंगवले असे या जवानाचे नाव असून या मारहाणीत इंगवले यांच्या हाताला जबर जखम झाली आहे. तसेच त्यांची वर्दी देखील फाटली . या धक्कादायक घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
महिनाभराच्या सुटीवर आलेले अशोक इंगवले हे सोनगाव (ता. बारामती) येथील रहिवाशी आहेत. शिवजयंती निमित्त गावामध्ये पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेसाठी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील अधिका-यांना निमंत्रण देण्यासाठी साआरएफ ११८ बटालियनचे जवान अशोक इंगवले त्यांच्या बंधून माजी सैनिक किशोर इंगवले यांच्यासह तालुका पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत दुचाकीवर एक अल्पवयीन मुलगा होता.
‘तुम्ही ‘ट्रीपल सीट’ का आला’ म्हणून सुरूवातीला पोलिस ठाण्याच्या आवारातील कर्मचारी व अधिका-यांनी वर्दीवर असणा-या अशोक इंगवले यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावर इंगवले यांनी ‘साहेब मी, कोणत्या कारणासाठी आलो आहे, ते तरी पहा’ अशी विनंती केली. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या बंद खोलीत नेऊन अशोक इंगवले यांना बेड्या घातल्या व सुमारे पंधरा ते सोळा कर्मचा-यांनी अमानुष मारहाण केली, असा आरोप इंगवले यांनी केला आहे. ही मारहाण इतकी गंभीर होती की, अशोक इंगवले यांच्या उजव्या हाताला जबर जखम झाली. तर अंगावर वळ देखील उठले आहेत. पोलिस मारहाण करीत असताना जीवाच्या आकांताने जवान ओरडत असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी बोलताना अशोक इंगवले म्हणाले, मागील आठ दिवसांपासून शिवजंयती निमित्त सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन आम्ही गावामध्ये केले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमध्ये माझे जिवलग ७ मित्र देखील होते. एका ताटात आम्ही जेवत असू हा धक्का सहन करीत शिवजयंती कार्यक्रमात पोलिस खात्यातील अधिकाºयांना बोलवून एक शोकसभा घेण्याचे नियोजन आम्ही केले होते. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण व परवाणगीसाठी आम्ही तालुका पोलिस ठाण्यात आलो होतो. माझ्यासोबत भारतीय सैन्यदलातून १ जानेवारीला निवृत्त झालेले मोठे बंधू किशोर इंगवले व एक छोटा मुलगा होता.
दुचाकी पोलिस ठाण्याच्या आवारात येताच पोलिस कर्मचारी विनोद लोखंडे यांनी अरेरावी भाषा वापरली. आम्ही लोखंडे यांना कार्यक्रमाच्या परवानगी व शोकसभेच्या निमंत्रणासाठी आम्ही आलो आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही त्यांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचे व्हीडीओ चित्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माझा मोबाईल देखील फोडला. सुमारे पंधरा पोलिसांनी मला लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बेकायदा माझ्या हातात बेड्या ठोकल्या. सुमारे दीड तास माझ्या हातात बेड्या होत्या. एका जवानास जर पोलिस अशी वागणुक देत असतील तर समान्य नागरिकांनी काय कथा, असा सवाल देखील अशोक इंगवले यांनी उपस्थित केला.