विशाल शिर्के पिंपरी : आगामी काही वर्षांमध्ये वेगाने वाढत असलेल्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या मालाची रसद पुण्यातून पुरविली जाणार आहे. ग्राहकांची मागणी पुरविण्यासाठी चाकण आणि तळेगाव येथे दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर मोठे औद्योगिक संकुल उभारले जाणार असल्याची माहिती, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली. घरगुती किराणा मालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, पादत्राणे, कपडे, पुस्तके अशा हव्या त्या वस्तू ऑनलाईन शॉपिंग कंपन्या विकत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदविल्यापासून दोन ते पाच दिवसांत या वस्तू घरपोच अथवा इच्छितस्थळी पोहचत्या केल्या जातात. या वस्तू पोहचविण्यासाठी त्या वस्तूंचा मध्यवर्ती साठा असणे गरजेचे असते. तरच, ग्राहकांना जलदगतीने वस्तू पोहचविल्या जाऊ शकतात. त्यासाठी मोठ्या आणि अत्याधुनिक औद्योगिक गोदामांची आवश्यकता भासणार आहे. यापूर्वी भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मालाचा साठा केला जात होता. आता चाकण आणि तळेगावला असेंडाज आणि हिरानंदानी ग्रुपची दोन औद्योगिक मालाची रसद पुरविणारी केंद्रे (लॉजिस्टिक सेंटर) उभी राहणार आहेत. या कंपन्यांना दीडशे ते दोनशे एकर जागा मंजूर झाली आहेत. .........................
चिनी कंपनी बनविणार इलेक्ट्रिकल व्हेईकलग्रेट वॉल ही १९८४ साली स्थापन झालेली चीनची आॅटोमोबाईल कंपनी आहे. ट्रक आणि स्पोर्ट्स युटीलिटी व्हेइकल (एसयूव्ही) बनविण्यामध्ये या कंपनीचा हातखंडा आहे.या कंपनीला तळेगाव येथे जनरल मोटरर्स कंपनीचे बंद पडलेले युनिट देण्यात येणार आहे. येथे ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वाहने बनविणार आहे. त्यासाठी तब्बल ३,७७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, २ हजार ४२ कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
..............................
सात प्रकल्प पुण्यात, ५ हजार कायम रोजगारनिर्मितीराज्य सरकारने १६ कंपन्यांशी परस्पर सामंजस्य करार केले आहेत. त्यातील सात प्रकल्प पुणे जिल्ह्यात होणार आहेत. हंगली इंजिनिअरिंग, हिरानंदानी लॉजिस्टिक, पीएमआय इलेक्ट्रॉनिक्स, ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्या तळेगावमध्ये तर, असेंडाज लॉजिस्टिक चाकण, साऊथ कोरियाची इस्टी ही इलेक्ट्रॉनिक सिस्टिम बनविणारी कंपनी रांजणगाव येथे उभारण्यात येईल. रॅक बॅक हे डाटा सेंटर हिंजवडीत उभारण्यात येणार आहे. हंगली (१५०), इस्टी (११००), पीएमआय इलेक्ट्रॉनिक्स (१५००) आणि ग्रेट वॉलमध्ये (२०४२) ४,७९२ कायमस्वरूपी रोजगार निर्माण होतील.