पुणे: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुणे ते भगत की कोठीसाठी (Bhagat Ki Kothi) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. ही गाडी साप्ताहिक असून आठवड्यातून एक दिवसच त्याची सेवा असणार आहे. गाडी क्रमांक (०१२४९) पुणे - भगत की कोठी ही पुण्याहून दर शुक्रवारी ८ वाजून १० मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी भगत की कोठीला पोहचेल. तर गाडी क्रमांक(०१२५०) हि गाडी भगत की कोठी येथून दर शनिवारी ८ वाजून २० मिनिटांनी निघेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी ७ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल.
ही सेवा २२ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. गाडीला वसई रोड, सुरत, अहमदाबाद, मेहसाणा,पालनपूर, धणेरा, जलोर, आदि स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्ष देशातील रेल्वे गाड्यांना ब्रेक लागला होता. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने विविध मार्गावरील रेल्वे सुरू होत आहेत.
येत्या आठवड्यात राज्यभरात महाविद्यालये सुरू होत आहेत. यामुळे लोकलमध्येही विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच लोकल गाड्यांच्या फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे. जरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडूने केले जात आहे.