पुणे : मध्य रेल्वेनेभुसावळ-पुणे-भुसावळ ही रेल्वे सोमवारी ऐनवेळी रद्द केल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.
दिवाळीत गावाला जाण्यासाठी खासगी गाड्या फुल्ल झाल्या असून तिकीटाच्या किंमतीही भरमसाट आहेत. एस टी महामंडळानेही दिवाळीत भाडे वाढविले आहे. अशावेळी गावी जाण्यासाठी असंख्य प्रवासी भुसावळ रेल्वेने जाण्याच्या तयारीत असतानाच रेल्वेने ही गाडी दोन्ही बाजूने रद्द केली आहे.
भुसावळहून मंगळवारी मध्यरात्री सुटणारी (११०२६) ही गाडी अचानक रद्द केली. त्यानंतर पुण्याहून आज सकाळी पावणेबारा वाजता सुटणारी भुसावळ एक्सप्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले की, भुसावळहून येणारा रेक हा पुढे हुतात्मा एक्सप्रेससाठी वापरला जातो व सोलापूरहून आलेला रेक दुसऱ्या दिवशी भुसावळ एक्सप्रेससाठी वापरला जातो. भुसावळहून येणारा रेक आज येणार नसल्याने हुतात्मा एक्सप्रेस रद्द करावी लागली असती. दोन्हीपैकी एक गाडी रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळे गर्दी व प्रवाशांची सोय पाहून हुतात्मा एक्सप्रेस रद्द न करता भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.