पुणे: पुण्यातीलच नव्हे, तर राज्य व देशात नाव झालेल्या बी. जे. शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील प्रयोगशाळेत कोरोनाची साथ आल्यापासून आतापर्यंत ७ लाख ५७ हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. राज्यातील इतर शासकीय, तसेच खासगी प्रयोगशाळांच्या तुलनेत सर्वाधिक आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्या करणारी राज्यातील बीजे ही पहिली शासकीय प्रयोगशाळा ठरली आहे.
राज्यात कोरोनाची तपासणी करणाऱ्या ७४ शासकीय प्रयोगशाळा या शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात आहेत, तर काही महापालिकेची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआयव्ही) या प्रयोगशाळांचा समावेश होतो. यामध्ये काेराेना तपासणीत बाजी मारली ती फक्त ‘बीजे’ने. काेराेनाकाळात विविध भरीव कामगिरी करणाऱ्या ‘बीजे’च्या प्रयाेगशाळेचे नाव हे दिल्लीपर्यंत पाेहोचले आहे. रात्रं-दिवस या विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक व सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांनी मेहनत घेतल्याने, तसेच अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
काेराेना आला तेव्हा २०२० मध्ये पुण्यात ‘एनआयव्ही’मध्ये कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी होत होती. त्याच मार्च महिन्यात ‘बीजे' वैद्यकीय महाविद्यालयाला तपासणीसाठी परवानगी मिळाली. त्यावेळी येथे प्रतिदिन तीन ते चार हजार आणि आता एक ते दीड हजार नमुन्यांची चाचणी हाेत असे.
बीजेच्या लॅबमध्ये आतापर्यंत कोरोनाची आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी
एकूण काेराेना चाचण्या - ७ लाख ६७ हजारआरटीपीसीआर चाचण्या - ६ लाख ६७ हजारअँटिजन चाचण्या - ९३ हजारदरराेज २५० ते ३०० चाचण्यापाॅझिटिव्हिटी दर - १० टक्केतपासणीचा कालावधी - साडेतीन तास
‘एनआयव्ही’लाही दिली मात
गेल्या वर्षी कोरोनाच्या आधीपासून संपूर्ण देशातूनच नव्हे तर इतर देशांतूनही एनआयव्हीमध्ये कोरोनाचे नमुने तपासणीसाठी येत असत. आताही तेथे चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले जातात; पण तेथे आतापर्यंत केवळ ४ लाख ५ हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. या नामांकित ‘एनआयव्ही’ला ‘बीज’ने मात दिली आहे.