पुणे : पुणे महापालिकेत आगामी महापौर निवडणुकीत भाजपाने मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांना केवळ एक वर्षाकरिता महापौरपद देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी जाहीर केले. पक्षातील इच्छुकांची संख्या बघता वरिष्ठ पातळीवर असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीकडून प्रकाश कदम यांनी महापौरपदासाठी तर काँग्रेसच्या चांदबी नदाफ उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महानगरपालिकेत 2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपचे निर्विवाद बहुमतासह 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. याबाबत खासदार संजय काकडे म्हणाले की, 'रविवारी रात्री उशिरा निर्णयबरेच इच्छुक असल्याने नेतृत्वाने सर्व पदे एक वर्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असून 99 पेक्षा अधिक मते मिळावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुण्यात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:49 PM