पुणे, दि. 21 - मुठा नदीच्या पात्रात एका मनोरुग्णानं उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यावेळी गस्तीवर असणा-या पोलिसांच्या ही बाब नजरेस आल्यानंतर या तरुणाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे. चेतन सकट (वय 17 वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या हाताला चावा घेऊन चेतनं मुठा नदी पात्रात उडी मारली. गुरुवारी दुपारी गुरुवारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पुना हॉस्पिटलजवळ ही घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी असे सांगितले की, चेतन हा मानसिक रुग्ण असून त्याच्या वडिलांनी उपचारासाठी त्याला पुना हॉस्पिटलमध्ये आणले होते. तेथे त्याने आरडाओरडा करुन पळ काढला. वडिलांच्या हाताचा चावा घेऊन त्यानं मुठा नदीपात्रात उडी मारली. व तो वाहत जात असताना लोकांचा आरडाओरडा परिसरात गस्त घालणारे पोलीस शिपाई आर. जी. साबळे, वसीम राजपूत यांनी ऐकला व भिडे पुलाजवळ त्याला पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. यानंतर चेतनला पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.