पुणे : पुणे व पिंपरीत शहरात १३ जुलै ते 23 जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.या लॉकडाऊनमध्ये पहिले ५ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. आज (दि.२० ) या लॉकडाऊनचा सातवा दिवस आहे. पण आता यापुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या वेगाने वाढत चाललेल्या साखळीला तोडण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात १० दिवसांच्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
राम म्हणाले, लॉकडाऊन हा पर्याय वापरून कोरोना पूर्णपणे संपणार आहे असे कुणाही अधिकाऱ्याचे मत नाही पण मध्यंतरीच्या काळात अचानकपणे कोरोना रुग्णांची खूप झपाट्याने वाढत होती. ही वाढ कुठेतरी नियंत्रणात आणणे आवश्यक होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र याकाळात आम्ही कुठलीही कंपनी,उद्योगधंदे बंद केले नाही. कोणत्याही व्यावसायिकाने प्रशासनाकडे या लॉकडाऊनविषयी तक्रार केली नाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी पुणे व पिंपरीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.
या लॉकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला चांगले सहकार्य देखील केले. मात्र यापुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही. पण नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी काही अभिनव प्रयोग आम्ही नक्की करणार आहे. कंटेन्मेंट झोनवर किंवा ज्या भागात रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहे तिथे देखील आवश्यक ते सर्व काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे असेही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.