पुणे : कंपनीसाठी तसेच रिअर इस्टेटसाठी पैशांची गरज असून, जर तुम्ही माझ्या कंपनीमध्ये रक्कम गुंतवली तर चांगला नफा अथवा रकमेच्या चौपट जागा देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि. च्या संचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रविराज रियालिटी चे मालक रविंद्र नौपातलाल साकला (रा. ढोले पाटील रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लि. चे संचालक सुमतीप्रसाद मीश्रीलाल बाफना (६२ रा. मरीन ड्राईव्ह, मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रविराज रिअॅलिटी मिलेनियमच्या ढोले पाटील रोडवरील कार्यालयात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र साकला यांचा रविराज रिअॅलिटी नावाने बांधकाम व्यवसाय आहे. तर आरोपी बाफना देखील व्यावसायिक आहेत. त्यामुळे साकला आणि बाफना यांची ओळख होती. मार्च २०२१ मध्ये बाफना हे रविंद्र साकला यांच्या पुण्यातील ढोले पाटील रोडवरील कार्यालयात आले. त्यांनी साकला यांना कंपनीसाठी आणि रियल इस्टेटकरीता पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. तसेच बाफना यांनी साकला यांना जर आमच्या कंपनीत पैसे गुंतवले तर चांगला नफा अथवा गुंतवलेल्या रकमेच्या चौपट जागा देण्याचे आश्वासन बाफना यांनी दिले. साकला यांनी विश्वास ठेवून बाफना यांच्या कंपनीत २ कोटी ५० लाख रुपये गुंतवले. यानंतर आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नेवसे करत आहेत.