पुणे : बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची पिळवणूक करुन त्यांची फसवणूक करतात. कराराचे पालन न करता त्यांना फ्लॅटचा ताबा देत नाही. करारातील सोयीसुविधा सोसायटीत उपलब्ध करुन देत नाही. परस्पर दुसऱ्याला फ्लॅट विक्री करतात. अशा असंख्य तक्रार महारेरा व पोलिसांकडे दाखल होत असल्याचे दिसून येते. मात्र, बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडे खंडणी मागण्याचा व खंडणी न दिल्यास गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युवराज सिताराम ढमाले (वय ४१, रा. अक्षयनगर, धनकवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रविलाल देवजीभाई प्रजापती (वय ४०, रा. गोकुळ हॉटेलसमोर, कोंढवा), जितू प्रजापती, आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते आतापर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज ढमाले हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा कोंढव्यात बांधकाम प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील पूर्ण झालेल्या साईटवरील फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतर सर्वांना देऊन सहकारी गृहनिर्माण अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे. आरोपी रविलाल प्रजापती यांना फ्लॅटचा ताबा दिला असून त्यांनी फिर्यादी ढमाले यांना सदस्यांची मिटिंग बोलावून कॉमन अँमिनिटीजचा ताबा अजून आम्हाला दिला नाही, असे सोसायटीच्या सदस्यांना भडकावून तुमच्या विरुद्ध तक्रार करायला भाग पाडेन. तुमची बदनामी करीन असे सांगितले. ते करु नये, यासाठी फिर्यादी यांच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.