कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. प्रदीर्घ काळापासून भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. रविंद्र धंगेकर हे कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. त्यामुळे जनतेचा कायम त्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यासोबतच ते सामान्यांचे नेते आहेत. रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामन्यांपासून उच्चभ्रू लोकापर्यंत ते सगळ्यांचे लाडके नेते आहे. त्यांच्या या कामामुळे मतमोजणी सुरु झाल्यापासून ते आघाडीवर होते.
विकासकामांच्या जोरावर रविंद्र धंगेकर मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. यात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. मातब्बर बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले. यातूनच खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. २०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९ मध्ये काँग्रेसनं धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं होतं.
रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया-
रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं देखील रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"