Pune Bypoll Election 2023 Exit Poll: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल आल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही मोठ्या प्रमाणावर उडाल्याचे पाहायला मिळाले. या पोटनिवडणुकीचा निकाल ०२ मार्च रोजी लागणार आहे.
पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे.
कसब्यात भाजपला धक्का? मविआचे कमबॅक!
स्ट्रेलिमा संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसू शकेल. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून, काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे सुमारे १५,०७७ मताधिक्यांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कसबा पेठ येथे हेमंत रासने यांना सुमारे ५९,३५१ मते तर, रवींद्र धंगेकर यांना सुमारे ७४,४२८ मते पडू शकतात, असे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे, चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या ३२,३५१ मतांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अश्विनी जगताप यांना १,२५,३५४ मते, दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना ९३,००३ आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ६०,१७३ मते मिळू शकतात, अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
रिंगसाईड रिसर्च एक्झिट पोल काय सांगतो?
रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रिंगसाईड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची विभागणी करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोलसमोर आला आहे . या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना ४५ ते ४७ टक्के, राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ३१ ते ३३ टक्के तर अपक्ष राहुल कलाटे यांना १८ ते २० टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"