पुणे : दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील एक ईव्हीएम मशीन सीलबंद नसल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनतर आता मतमोजणी काहिकाळासाठी थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा मतमोजणी सुरु झाली आहे .
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली. कॅन्टोन्मेंट मतदार संघाची पहिली फेरी पार पडल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला 14 क्रमांकाच्या टेबलवरिल ईव्हीएम मशीन सीलबंद नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. व्हीव्हीपॅट मशीन मधील मतांची आधी मोजणी करावी आणि नंतरच ईव्हीएम मशीन ला हात लावावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
ईव्हीएम मशीन सीलबंद करायची राहिली असेल असे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. परंतु कार्यकर्त्यांनी जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. आता या मतदारसंघाची मतमोजणी थांबवण्यात अली आहे. दरम्यान मतमोजणी ठिकाणचा गोंधळ पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले.
दरम्यान कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पाहिल्याफेरी मध्ये भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर आहेत.