काल देशाचे संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देशातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डातील रुग्ण व त्यासाठी बोर्डाने केलेल्या उपाययोजना याची सविस्तर माहिती घेत त्यावर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेने शक्यतो लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे याविषयी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड राज्य आपत्तीव्यवस्थापन निवारण निधी कक्षाकडे पटेल रुग्णालयातील तयार असलेल्या नवीन इमारतीमध्ये वय वर्ष १० च्या आतील लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागांतर्गत १० बेड व ७० ऑक्सिजन बेड उभारण्यासाठी निधी मागणार असल्याचे कळते. याबाबत तसा प्रस्ताव देखील बोर्डाने तयार केला आहे.
याबाबत देशाचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी पुणे, खडकी सहित देशातील १२ कॅन्टोन्मेंट बोर्डाला करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात बोर्ड रुग्णालयात बालरुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यासंदर्भात तसेच कोरोनासंदर्भात इतर सर्व महत्त्वाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रक्षा संपदा विभागाच्या संचालक विभागातील वरिष्ठ अधिकारी जे कॅन्टोन्मेंट बोर्ड नियंत्रण करतात यांनी सांगितल्याप्रमाणे संरक्षक सचिव भारतातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णालयाची भविष्यातील ऑक्सिजनची समस्या सोडवण्यासाठी रुग्णालयातच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासंदर्भात मुख्य नियंत्रक रक्षा संपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले असून त्याला प्रधानमंत्री काळजी निधी अंतर्गत आरोग्य संदर्भातील पायाभूत सुधारणा उभारण्यासाठी लगेच मान्यता देण्यात येईल, असे सांगण्यात आले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी खासदारांकडून २५ लाख रुपये निधी आगोदरच कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला आहे.