पुणे : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांकडून १० हजार रुपये दंड घेण्याच्या निर्णयाला शहरातील विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने विरोध केला आहे.
दुकान आणि विविध कार्यालयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले. मास्क न घातलेल्या व्यक्तीकडून एक हजार रुपये दंडाऐवजी तो दंड ५०० रुपयापर्यंत कमी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महासंघाने ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाची २० हजार भित्तीपत्रके शहरातील विविध दुकानात लावली आहेत. मास्कशिवाय दुकानात प्रवेश दिलाच जात नाही. यापुढेही दिला जाणार नाही. व्यापारी ग्राहकांच्या जीवाची काळजी घेत आहेत. एखाद्या ग्राहकाने वैद्यकीय कारण अथवा श्वासाच्या कारणामुळे मास्क खाली घेतला. त्याच वेळी अधिकारी आले तर संबंधित ग्राहकाला एक हजार रुपये आणि दुकानदाराला १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हे चुकीचे आहे. यात दुकानदारांचा कोणताही दोष नाही, मग त्यांना दंड का, असा सवाल व्यापारी महासंघाने केला आहे. छोटे दुकानदार ही रक्कम भरणार तरी कुठून, असाही प्रश्न करण्यात आला आहे.