पुणे : कोरोनामुळे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर आर्थिकदृष्टया वाईट परिणाम झाले आहेत. सरकारने आधी रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली. त्यावेळी व्यापारी संघाने समजुतदारपणाची भूमिका घेतली. मात्र, पुन्हा व्यवसायाच्या वेळा कमी करण्यात आल्याने त्याचा फटका बसणार आहे. पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले, “आधीच्या निर्णयावर पुणे व्यापारी महासंघाने एक तास वेळ वाढवून मागितली होती. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर नवीन नियमावली जाहीर करण्याआधी प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी बोलणे आवश्यक होते. व्यापारी आणि जनतेची मते विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला. सकाळी सहा वाजता दुकाने उघडणे अशक्य आहे. व्यापारी वर्गात महिला कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी सहाच्या आत घरातील कामे आवरून येणे अवघड होणार आहे. तसेच एवढ्या सकाळी प्रवास करणे नोकरदारवर्ग आणि महिलांसाठी कठीण आहे.”
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून अजूनही व्यापारी वर्ग सावरलेला नाही. त्यांच्या डोक्यावर असणारे कर्ज वाढत चालले आहे. व्यापाऱ्यांना कर्जाबाबत कुठल्याही प्रकारची सूट दिली नाही. त्यांनी सर्व कर भरून आपल्या दुकानातील कर्मचारी वर्गाला पगार देणेही बंधनकारक केले आहे. सकाळी अकराशिवाय बाजार उघडत नाही. तेच सायंकाळी पाच वाजता बंद करावे लागणार आहे. सहा तासाच्या व्यवसायात व्यापारी नोकरांचा पगार, स्वत:चा व्यवसाय, नियम, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष कसे देणार असा सवाल रांका यांनी उपस्थित केला. कामगारांना महिन्याचे पगार दिले नाहीतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार याचा सरकारने विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
चौकट
गुढीपाडव्याच्या उत्साहावर विरजण
“महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. येत्या १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नव वर्षाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सरकार कुठल्या आधारावर हे निष्कर्ष काढते की दिवसा कोरोना होणार नाही. सायंकाळी फिरल्यानंतर कोरोना होतो असे शासनाला वाटते काय? सरकारने जनतेचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन संचारबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा. सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत दुकाने खुले ठेवण्याची परवानगी द्यावी.”
-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ