पुणे: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. ऐन श्रावणात मंदिर बंद झाल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे. देवस्थानने पत्रकाद्वारे कळवले आहे कि, श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. देवीची उत्सव मूर्ती या कालावधीत पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध असेल. भाविकांनी या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्रात चतु: श्रुंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. राज्यभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनसाठी येत असतात. आता मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने मंदिर एक महिना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. श्रावणात देवीचे दर्शन घेता यावे यासाठी भाविकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. देवीची उत्सव मूर्ती या एक महिन्याच्या कालावधीत पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवरात्र उत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा या ठिकाणी होतात. दररोज सकाळी 10 आणि रात्री 8 वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीत मंदिर 24 तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते. पोलीस यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था केली जाते.
काय आहे इतिहास?
इ.स. 18 शतकात पुण्यात पेशव्याची सत्ता होती. दुर्लभशेठ महाजन नावाचे एक पेशव्यांचे सावकार होते. दुर्लभशेठ वणीच्या सप्तशृंगी देवीचे परमभक्त होते. जास्त वय झाल्यामुळे त्यांना वणी येथे जाणे अशक्य झाले व याचे त्यांना खूप दुःख होऊ लागले. त्याच वेळी देवीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दृष्टांतात पुणे शहराच्या वायव्य भागात मी आहे असे सांगितले. सांगितलेल्या ठिकाणी उत्खनन करुन पाहिले असता; देवीची एक स्वयंभू मूर्ती दिसली. या मूर्तीवर शेंदूराचा लेप लावून डोळे बसविण्यात आले. तेव्हा पासून नवरात्र उत्सव हे मंदिरात होऊ लागले आणि आज पाहता पाहता लाखो भक्त नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी येत असतात, असं मंदिर विश्वस्त हेमंत अनगळ यांनी सांगितले आहे.