पुणे : पोलिसांच्या क्रेडिट सोसायटीच्या पदाधिका-यांनी पोलीस उपनिरीक्षकाचीच फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्जाची परतफेड करूनही खात्यामधून बेकायदेशीरपणे पैसे वर्ग केल्याप्रकरणी सोसायटीच्या लिपिक आणि सेक्रेटरीसह अन्य काही जणांविरूद्ध बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक के. के. कांबळे यांनी याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. कांबळे हे कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते १९८९ पासून दि. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पोलीस आयुक्त कार्यालय या संस्थेचे सभासद आहेत. त्यांनी या संस्थेकडून २०१४ मध्ये कर्ज घेतले होते. या कर्जाची वेतनामधून दरमहा नियमित परतफेड कांबळे यांच्याकडुन केली जात होती. उर्वरित ६ लाख ५७ हजार ७१ रुपयांचे कर्ज त्यांनी स्टेट बॅंकेच्या धनादेशाद्वारे एकरकमी फेडले होते.
कर्ज खाते निरंक करण्यात आले. दरमहा वेतनामधून कापली जाणारी शेअरची रक्कम रोख स्वरूपात संस्थेत भरण्यात आलेली आहे. त्यानंतर वेतनामधून कपात होणारी दरमहा शेअरची रक्कम इसीएसद्वारे बॅंक खात्यामधून व्हावी याकरिता अर्ज भरून देण्यात आलेला आहे. हा अर्ज भरून देताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नव्हते. तरीही, केवळ ईसीएसवर सही करून दिल्याचा फायदा घेत सोसायटीच्या महिला लिपिक वाघमारे, सेक्रेटरी जगताप आणि अन्य संबंधित व्यक्तींनी कांबळे यांच्या स्टेट बॅंकेच्या खात्यावरून सप्टेंबर, ओक्टॉबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा १३ हजार ३०० रुपये असे एकूण ३९ हजार ९०० रुपये पदभारे कपात करून घेतली. या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
याबाबत समक्ष संस्थेत जाऊन लिपिक वाघमारे आणि सेक्रेटरी जगताप यांची भेट घेतली असता त्यांनी उडवाउडावीची उत्तरे दिल्याचेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. अन्य सभासदांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असण्याची शक्यता गृहीत धरून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेलाही पत्र दिले आहे.