पुणे : रोजगार, शिक्षणासाठी पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. नागरिकांना शिक्षण, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नाईलाजाने स्वत:चे वाहन विकत घ्यावे लागते. त्यामुळे दर वर्षी जवळपास सव्वा लाख वाहनांची भर पडत आहे. त्या प्रमाणात रस्ते, इतर सुविधा आणि वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सकाळी-सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी वाढत जाताना दिसत आहे. त्यामुळे कोठेही जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार हे गृहीत धरून अर्धा तास आधीच घरातून बाहेर पडलेले बरे.
शहरातील वाहनांची संख्या ३० लाखांपुढे
शहरात दरवर्षी सुमारे सव्वा लाख वाहनांची भर पडत आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी वाहनांची संख्या जवळपास ७० हजारांहून अधिक आहे. त्या खालोखाल दरवर्षी ४० हजार कारची भर पडत आहे. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतील बसची संख्या शेकड्यानेच वाढताना दिसते. त्याचा परिणाम दररोज रस्त्यावर येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या वाढत आहे.
मेट्रोची उभारणी मंदगती
शहराची दोन टोके जोडणाऱ्या मेट्रोच्या उभारणीत अक्षम्य दिरंगाई झाली असून आता केवळ ५ किमीचा वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग सुरू झाला आहे. त्याचा नियमित प्रवाशांना काहीही फायदा होताना अजून तरी दिसत नाही.
अपुरे मनुष्यबळ
४० लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात सध्या ३० लाखांहून अधिक वाहने आहेत. त्या मानाने केवळ ९२५ वाहतूक पोलिसांची संख्या आहे. हे पाहता प्रत्येकी साडेतीन हजार वाहनांमागे एक वाहतूक पोलीस असे हे प्रमाण पडते.
वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगलाही जाता कमी पडत असल्याने आता रस्त्यांवर कोठेही गाड्या उभे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी वाहतूक विभागाने खासगी कंपन्यांची मदत घेतली आहे.