विवेक भुसे -
पुणे : वाहतूकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत, यासाठी हेल्मेटसक्तीसह वाहतूकी नियमभंगाविरोधात मोहिम राबविली जाऊन मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी केली जाते.कोरोना प्रादुर्भावामुळे आता विना मास्क फिरणाऱ्यांवर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु असून आतापर्यंत ३० कोटी रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक दंड वसुली पुणे शहर व जिल्ह्यातून करण्यात आली आहे. पुणे शहरात साडेपाच कोटी रुपये पुणेकरांकडून दंड वसुली करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी २ सप्टेंबरपासून १४ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १ लाख १० हजार ५३५ पुणेकरांवर विनामास्कची कारवाई केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत ५ कोटी ४५ हजार रुपये दंड वसुल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर शासनाने घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केले. सुरुवातीला त्यावर १८८ प्रमाणे कारवाई होऊन गुन्हा दाखल होत असे. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे महापालिकेने २ सप्टेंबरपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड करण्यास सुरुवात केली.
महापालिकेने दंडवसुलीची जबाबदारी पोलिसांवर सोपवली.त्याप्रमाणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढीसचे कारण पुढे करुन पोलिसांनी चौकाचौकात उभे राहून कारवाई करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही दिवसात दिवसाला ५ हजारांहून अधिक नागरिकांना पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुली करण्यात येत होती.
दंडवसुली सुरु झाल्यावर मास्क वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यामुळे विनामास्कची कारवाई कमी होऊ लागली.त्याचवेळी महापालिकेने विनामास्क कारवाई जो दंड जमा होईल, त्यापैकी निम्मी रक्कम शहर पोलीस दलाच्या कल्याण निधीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला़ त्याच दरम्यान प्रत्येक पोलीस ठाण्याला विनामास्क कारवाईचे टारगेट ठरवुन देण्यात आले़ टारगेट पूर्ण करण्यासाठी चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मास्क अनेक दिवस वापरल्यानंतर त्याचे इल्यास्किट सैल होऊन गाडीवरुन जाताना ते वाऱ्यामुळे अनेकदा थोडे खाली सरकते. चौकात थांबलेले पोलीस असा मास्क थोडा जरी नाकावरुन खाली घसरलेला दिसला की त्या वाहनचालकाला बाजूला घेऊन आपले 'टार्गेट' पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.त्यातून वाहनचालक आणि पोलीस यांच्या वादावादीचे प्रसंग वाढले आहेत. कोणीही वाहनचालक दंड भरण्याऐवजी कारणे देऊ लागला तर त्याला सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाऊ लागली आहे. त्यामुळे असंख्य वाहनचालक तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत ५०० रुपये दंड भरत असल्याचे चित्र रस्त्यावर दिसून येत आहे.
ग्रामीण पोलिसांकडून विनामास्क कारवाई धडाक्यात राबविली जात आहे. जिल्ह्यात दररोज जवळपास २ हजार जणांवर विनामास्कची कारवाई केली जात आहे. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ७० हजारांहून अधिक नागरिकांवर विना मास्कची कारवाई केली असून त्यांच्याकडून जवळपास सव्वा कोटी रुपये दंड वसुल केला आहे. कोविडमुळे झालेला महसुल अशा प्रकारे पोलिसांमार्फत भरुन काढण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.़़़़़़़़़़़विना हेल्मेटचे ४ लाख ई चलनअनलॉकमध्ये वाहतूक वाढल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे विना हेल्मेट घालून फिरणाऱ्या दुचाकी वाहनचालकाविरुद्ध पुन्हा कारवाई सुरु केली आहे़ जूनपासून सप्टेबर अखेरपर्यंत पुणे वाहतूक पोलिसांनी ४ लाखांहून अधिक विनाहेल्मेटची कारवाई केली असून त्यांना ई-चलन पाठविण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोकांनी रस्त्यावर वाहने आणू नयेत, म्हणून वाहतूक शाखेने १३ ठिकाणी नाकाबंदी केली होती. तेथे वाहनचालकांवर पूर्वीची काही कारवाई आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यात १३ हजार ३४९ जणांकडून तब्बल ६० लाख ४० हजार ९३६ रुपये दंड वसुल करण्यात आला होता.