शिवणे : पुणे शहराच्या आसपास असलेल्या ३२ गावांची ग्रामपंचायत रद्द करून त्यांचा समावेश महापालिका कार्यक्षेत्रात केला गेला, त्याला आता चार वर्षे होत आली आहेत. महापालिकेत समायोजन झाल्यावर रस्ते, ड्रेनेज, लाईट या प्राथमिक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र ती अपेक्षा फोल ठरली. शिवाय मिळकत कर प्रचंड लादला गेला आहे, इतका मोठा कर भरण्यास नागरिकांनी विरोध केला; मात्र महापालिकेकडून करामध्ये सवलत दिली जात नाही त्यामुळे कराच्या थकबाकीसाठी अख्खे गाव विकणे आहे असा फलकच ग्रामस्थांनी गावागावांत लावत प्रशासनाचा निषेेध केला आहे.
धरण उशाला असून देखील येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने एकेका सोसायटीला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अरुंद रस्ते आणि त्याभोवती वाढलेली अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. करोडो रुपयांचा कर या गावांतून गोळा होत असताना देखील सुविधांच्या बाबतीत सदर गावांना सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याची नागरिकांची भावना झालेली आहे. प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सुविधा मिळत नाहीत; परंतु टॅक्स मात्र भरमसाठ आकारला जात आहे. लाखो रुपयांचा मिळकत कर भरावा लागत असल्यामुळे या गावांमधील नागरिक त्रस्त झालेले आहेत. मिळकत कर न भरल्यास मिळकतींवर जप्तीचे प्रकार होत आहेत.
मागील काही वर्षांत टॅक्स एवढा भरमसाठ वाढलेला आहे की, सगळे घरदार विकले तरी टॅक्स भरू शकत नाही अशी धारणा समाविष्ट गावांतील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे या ३२ गावांतील नागरिकांनी ‘गाव विकणे आहे' अशा आशयाचे फलक लावून निषेध आंदोलन सुरू केलेले आहे. गाव विकणे आहे अशा मजकुराचे फलक सर्व गावागावांत झळकत असल्याने हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे व आमचा टॅक्स भरून घ्यावा अशा तीव्र भावना या गावातील नागरिकांच्या दिसत आहेत.
आगामी विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने समाविष्ट केलेल्या ३२ गावांचा टॅक्स कमी करून ग्रामपंचायतीच्या धर्तीवर आकारावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल तसेच जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही व नव्याने सुधारित दर लागू होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय ३२ गावांतील नागरिकांनी घेतलेला आहे. गाव विकणे आहे अशा आशयाचे फलक धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किटकटवाडी, खडकवासला, नांदोशी, नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या भागात लावण्यात आलेले असून या मागील नागरिकांच्या तीव्र भावना स्पष्ट जाणवत आहेत. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे यावेळी ३२ गाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.