पुणे : महावितरणच्यापुणे परिमंडलात तब्बल २५३.९४ मेगावॅट क्षमतेचे १० हजार १७० छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या ७ हजार ५८० ग्राहकांकडील ७२ मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. तर ९६.७९ मेगावॅट क्षमतेचे आणखी ३ हजार ५८० प्रकल्पांचे काम सुरू आहे.
महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. उदा. ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे ४९ हजार ६०० रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे ७४ हजार ४०० रुपयांचा खर्च करावा लागेल. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या ७५८० घरगुती ग्राहकांकडे ७२ मेगावॅट, १३६४ वाणिज्यिक- ३६.११ मेगावॅट, ६४१ औद्योगिक- ११०.२८ मेगावॅट आणि इतर ५८५ ग्राहकांकडे ३५.५५ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यातून सुमारे २५४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. तर १७.८३ मेगावॅटचे २८८० घरगुती, १५.०१ मेगावॅटचे ३४३ वाणिज्यिक, ५५.६४ मेगावॅटचे २२४ औद्योगिक तर ८.३१ मेगावॅटचे १३३ इतर वर्गवारीतील सौर प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.
''छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्षे लाभ होतो. यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल''