श्रीकिशन काळे
पुणे : अतिशय थंड हवेचे ठिकाण म्हणून पुण्याचा नावलौकिक होता. त्यामुळे मोठमोठे अधिकारी निवृत्तीनंतर इथे स्थायिक व्हायला येत असत. येथील हिरवाई सर्वांनाच आकर्षून घेते. शहरात सध्या महापालिकेची २१० उद्याने आहेत. त्यातही वैविध्य पाहायला मिळते. सुमारे ६०० एकर जागा याने व्यापलेली आहे. म्हणून ‘उद्यानांचे शहर’ म्हणूनही त्याची नवी ओळख समोर येत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात कुठेही उद्यानांची संख्या कदाचित नसावी.
औषधी वनस्पती विभाग, दुर्मीळ झाडे, पाम उद्यान, साहसी उद्यान, प्राण्यांचे मोठे पुतळे असणारे उद्यान अशा कितीतरी प्रकारच्या उद्यानांची भर पुण्यात घातलेली आहे. आज शहरात काँक्रिटीकरण वेगाने होत असले तरी झाडांवरील प्रेम कायम आहे. महापालिकेने ठिकठिकाणी सुंदर-सुंदर बागा फुलवल्या आहेत. पुणेकर शनिवारी-रविवारी हमखास या उद्यानांमध्ये फिरायला जातात. काही ठिकाणी सकाळ-संध्याकाळीही चालण्यासाठी पुणेकरांची गर्दी होते. महापालिकेची उद्याने सोडली, तर खासगी उद्यानांची इथे परंपरा आहे.
- एम्प्रेस गार्डन हे अतिशय जुने असून, त्या ठिकाणी दुर्मीळ झाडे पाहायला मिळतात.- जापानी पद्धतीचे आणि ओकायामा मैत्री नावाने साकारलेले पु. ल. देशपांडे उद्यान अतिशय सुंदर आहे. त्याच्या बाजूलाच मोगल गार्डन पाहायला मिळते. अतिशय नियोजनबद्ध अशी ही गार्डन तयार केलेली आहेत.- सहकारनगर येथे तर खास फुलपाखरांसाठी उद्यान तयार करण्यात आले आहे.
नाला गार्डनला प्राेत्साहन
नाला गार्डन ही एक नवीन संकल्पना गेल्या काही वर्षांपासून रुजली आहे. खासगी आणि महापालिकेच्या वतीने अशी उद्याने नाल्याच्या शेजारी बनवली आहेत. जेणेकरून नाल्याशेजारची जागा चांगली राहील, तर तिथे कचराकुंडी होणार नाही.
''नागरिकांनी कुटुंबासोबत उद्यानात येऊन निवांत वेळ घालवावा; हिरवळीमध्ये बसावे, यासाठी दोनशेहून अधिक बागा साकारल्या आहेत. त्यांच्या देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्त आहेत. तब्बल ६०० एकरांहून अधिक क्षेत्रावर २१० उद्याने पसरलेली आहेत. नागरिकांना आनंद मिळावा हाच उद्देश आहे. - अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका''
काय आहे इतिहास?
पुण्यात गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये मानवनिर्मित हिरवाई बहरली आहे. येथील बागांचा इतिहासही मोठा आहे. १७४० च्या सुमारास थोरले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या काळात पुणे राजधानीचे शहर बनले. पेशवे व त्यांचे मोठे सरदार-सावकारांचे वाडे-महाल बनू लागले. तेव्हा बागाही तयार केल्या. तुळशीबाग, बेलबाग, रमणबाग, चिमणबाग, सीताफळबाग, हिराबाग, मोतीबाग अशा १० ते १५ बागा पेशवाईत निर्माण झाल्या. त्या बागांमध्ये धान्यांपासून ते फळांपर्यंत सर्व उत्पादन घेतले जात असे. आज त्यांतील बागा नामशेष झाल्या असून, त्यांची नावे मात्र घेतली जातात.
नव्याने काही बागांचे काम सुरू
उद्यान खात्याची स्थापना १ एप्रिल १९५० रोजी करण्यात आली. त्यात आधी पुण्यात १६ बागा या खात्याकडे सुपुर्द केल्या. आज महापालिकेच्या उद्यान विभागाकडे २१० बागा आहेत. अजून काही बागांचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या ७० वर्षांमध्ये २०० बागा तयार झाल्या.