पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले असून सोमवारी रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरु होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे़ कारवाईची वेळ आणू देऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. सोमवारी रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
याविषयी बोलताना पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. शहरात रात्री बंदोबस्त लावण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरगावाहून विमान, रेल्वे, बसने येणार्या व जाणार्यांनी आपल्याबरोबर प्रवासाचे तिकीट ठेवावे. हॉटेल, रेस्ट्रारंट यांना रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व आवराआवर करुन त्यांना घरी जाण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला आहे.
२६० पोलीस कोरोना बाधित
''शहर पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या काही दिवसात शहर पोलीस दलातील २६० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील २ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर सर्व जण घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य व मदत पोलीस कल्याण विभागाकडून दिले जात आहे. सर्व पोलीस ठाणे व विभागांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना तसेच सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.''