पुणे : कलेचा वारसा समृद्ध करणारी फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) सारखी जागतिक पातळीवरची संस्था पुण्याचे भूषण मानली जाते. कित्येक वर्ष ही संस्था सामान्य रसिकांपासून कोसो दूरच होती. कलाकारांची फळी घडविणाऱ्या या संस्थेबद्दल उत्सुकता असूनही संस्थेच्या अभेद्य भिंती सुरक्षिततेच्या कारणास्तव ओलांडण्याचे धाडस सर्वसामान्यांना कधी झालेच नाही. मात्र, गेल्या वर्षीपासून संस्थेच्या प्रशासनाकडून ही दरी दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आजवर विद्यार्थी आणि कलाकारांसाठीच प्रवेश असलेल्या या संस्थेची कवाडे सामान्यांसाठी खुली झाली आणि या अभिनव उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणेकरांना पुन्हा संस्थेमध्ये ‘एंट्री’ मिळणार आहे.येत्या ११ व १२ आॅगस्ट रोजी ‘एफटीआयआय फॉर पुणे, पुणे फॉर एफटीआयआय’ शीर्षकांतर्गत पुणेकरांसाठी ‘ओपन डे’ उपक्रम राबविला जाणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारित असणा-या या संस्थेची पुण्यात १९६० मध्ये प्रभात संग्रहालयाच्या जागेवर स्थापना झाली. त्यानंतर १९७४ मध्ये दिल्लीतील दूरचित्रवाणी विभाग पुण्यात हलविण्यात आला. चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी आवश्यक तंत्रज्ञ, अभिनेते, दिग्दर्शक घडविण्याचे प्रशिक्षण या संस्थेत देण्यास सुरूवात झाली. भारतीय चित्रपट सृष्टी व दूरचित्रवाणीला समृद्ध करणारी रत्ने याच संस्थेमध्ये घडली, यात अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. आॅस्कर पुरस्कार विजेता रसुल पोकुट्टी हा देखील याच संस्थेचा विद्यार्थी. या गोष्टींमुळे ही संस्था पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. संस्थेमध्ये नक्की काय शिकविले जाते, वातावरण कसे आहे याबाबत सर्वसामान्यांच्या मनात कायमच उत्सुकता राहिली. मात्र,ती सामान्यांना तिथे प्रतिबंध होता. आमदार विजय काळे व शनिवारवाडा कला महोत्सव समितीने पुणेकरांना संस्था पाहता यावी यासाठी सातत्याने प्रशासनाने पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले. प्रशासनाने वर्षातून दोन दिवस संस्था सामान्यांसाठी खुली करण्यास मान्यता दिली..या उपक्रमामुळे प्रभात संग्रहालय, चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान, अभिनय, दिग्दर्शन, संपादन, दूरचित्रवाणीचा स्टुडिओ, ध्वनीमुद्रण तंत्रज्ञान याची माहिती पुणेकरांना मिळत आहे. शनिवार (11 आॅगस्ट) ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. रविवार (१२ आॅगस्ट) रोजी संस्था इतरांनी खुली राहणार आहे. संस्थेला भेट देऊ इच्छिणा-यांनी www.ftiindia.com संकेतस्थळावर अथवा संस्थेच्या मुख्य दरवाज्याजवळ दि. ८ ते १० आॅगस्ट रोजी ११ ते ५ दरम्यान नोंदणी करणे बंधनकारक आहे.--------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणेकरांना एफटीआयआयमध्ये पुन्हा ‘एंट्री’ ; ओपन डे चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 7:22 PM
एफटीआयआय मध्ये रसिकांना पूर्वी प्रवेश होता. परंतु, सुरक्षिततेच्या कारणास्तव तो प्रवेश नंतर बंद करण्यात आला.आता पुन्हा ती संधी त्यांना मिळणार आहे.
ठळक मुद्देयेत्या ११ व १२ आॅगस्ट रोजी ‘एफटीआयआय फॉर पुणे, पुणे फॉर एफटीआयआय’ शीर्षकांतर्गत पुणेकरांसाठी ‘ओपन डे’ उपक्रम दि. ८ ते १० आॅगस्ट रोजी ११ ते ५ दरम्यान नोंदणी करणे बंधनकारक