पुणे: महावितरणचेवीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीज बिलांचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ३ लाख ५ हजार ३०० ने वाढली आहे. सद्य:स्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी २१ लाख ३८ हजार ३५० (७४.५ टक्के) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे ५५९ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा ऑनलाइनद्वारे घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत. वाढलेल्या ग्राहकसंख्येत पुणे शहरातील सुमारे दीड लाख ग्राहक आहेत.
महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी २८ लाख ७० हजार ९८९ ग्राहक दरमहा वीज बिल भरतात. त्यातील ७४.५ टक्के म्हणजे २१ लाख ३८ हजार ३४८ ग्राहक ऑनलाइनद्वारे वीज बिलांचा भरणा करीत आहेत, तर २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ऑनलाइन ग्राहकांमध्ये ३ लाख ५ हजारांची भर पडली असून, भरण्याची रक्कमदेखील १२९ कोटी रुपयांनी वाढली आहे.
११ लाख पुणेकर करतात ऑनलाइन भरणा
पुणे शहरात वर्षभरात ऑनलाइनसाठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४६ हजार ३०० ने वाढली असून, भरण्याच्या रकमेत देखील ५९ कोटी ३१ लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्य:स्थितीत सरासरी ११ लाख ८० हजार १९१ (७३.६ टक्के) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा २९५ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा ऑनलाइन भरणा करीत आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे.
महावितरणच्या ऑनलाइन सेवेला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन वीज बिल भरण्यासोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीज बिल भरण्याची मर्यादा किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीज बिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल