पुणे : वारकऱ्यांसह सर्वच पुणेकरांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिराच्या (नाना पेठ) व्यवस्थापनाने उत्सव मंडप उभारले असून, मंदिराला रंगरंगोटी, गाभाऱ्यात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्याने मंदिराच्या विश्वस्तांपासून ते सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. काेराेना संकटामुळे दाेन वर्षांनंतर पायी साेहळा निघत असल्याने दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंदिरांकडून तयारी पूर्ण झाली आहे. दाेन दिवसांचा पुणे मुक्काम करून पालख्या शुक्रवारी, २४ जूनला पहाटे प्रस्थान करणार आहेत.
जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे. मंदिराबाहेर महापालिकेकडून उत्सव मंडप उभारण्यात आला असून, त्यात विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरातील चांदीच्या कमानींचे पॉलिश आणि मंदिराची साफसफाईही करण्यात आली आहेत. दिंडीतील वारकऱ्यांचा विसावा मंदिरातील सभागृहात असतो. त्याचीही साफसफाई केली आहे. जवळपास तीन हजार वारकरी मुक्कामाला असणार आहेत. त्यांच्यासाठी दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची सोय केली जाणार आहे. पालखीचे स्वागत विश्वस्तांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने होईल. भाविकांच्या दर्शनासाठी योग्य व्यवस्था केली असून, पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या रांगेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट करणार आहोत असे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी सांगितले आहे.
मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, उत्सव मंडपाची उभारणी आणि सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाचीही व्यवस्था केली आहे. दोन दिवस मंदिरात जवळपास ६ ते ७ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या दर्शनाची व्यवस्थाही केली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा न झाल्याने सर्वांमध्ये उत्साह असल्याचे भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले आहेत.