पुणे : वाहतूक पाेलिसांकडून दंडात्मक कारवाई थांबल्याने बेशिस्त वाहनचालक सुसाट सुटले आहेत. वाहतूक पोलिसांसमोरूनच नियम मोडून जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढू लागली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हावी. पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा, अशी प्रतिक्रिया पुणेकर नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतुकीचे नियमन करावे, रस्त्यावर उभे राहून पावत्या फाडू नये, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या महिन्यात काढले होते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून नो-पार्किंग, तसेच सिग्नल तोडणे अशा विविध वाहतूक नियम ताेडणाऱ्यांवर रस्त्यात केली जाणारी दंडात्मक कारवाई थांबली. त्याचा गैरफायदा प्रामुख्याने कारचालक घेऊ लागले आहेत. त्यामुळे अनेकदा डबल पार्किंग झाल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
वाहतूक पोलिसांकडील दंडात्मक कारवाई बंद केल्याने जून महिन्यात तब्बल ५ कोटी रुपयांचा दंड कमी झाला. वाहतूक पोलिसांचे अधिकार कमी केल्याने वाहनचालक काहीसे बिनधास्त झाले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी सायकलवर डबल सीट जाताना चौकात सायकल चालविणारा मागे बसलेल्याला उतरवून पुढे चालत जा, असे सांगत होता. कारण चौकातील पोलीस डबल सीट दिसला तर दंड करणार नाही. पण, सायकलची हवा सोडेल. कान पिरगाळेल, अशी भीती होती. आता तरुणांना भीती राहिली नाही. बिनधास्तपणे ट्रिपलसीट जातात. अशांवर काहीतरी धाक हवा.
जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, कॅम्पमधील महात्मा गांधी रोड येथे वाहनांची नेहमीच गर्दी असते. या रस्त्यांवर मोटारीच्या पार्किंगची सोय आहे. तरीही मोटारींचे डबल पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीच्या मानाने माेटारींमुळे वाहतूककोंडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक पोलिसांकडील मशीन काढून घेतल्याने अशा वाहनचालकांचे मालक शोधणे पोलिसांना अवघड झाले आहे. पूर्वी अशा गाड्या वाहतूक पोलीस तातडीने टोईंग करुन उचलून नेत किंवा जॅमरची कारवाई केली जात असे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर धाक असायला हवा, असे नागरिकांचे मत आहे.
पोलिसांचा धाक गरजेचाच
वाहतूक पोलीस सध्या दंडात्मक कारवाई करत नसले, तरी बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचा धाक गरजेचा आहे. पुण्यात असंख्य लोक अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवत असतात, त्यांच्यावर कारवाई होणे देखील गरजेचे आहे. एक-दोनदा समज दिल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांच्यावर कडक कारवाई झाली तर पुढे असे वाहनचालक शिस्तीने वाहन चालवतील. - योगेश खाडे
दंड नकोच..
सगळेच वाहनचालक मुद्दाम वाहतुकीचे नियम तोडत नाहीत. अनेकदा अत्यावश्यक कारणास्तव नियमांचे उल्लंघन होते. अनेकदा दंडाएवढे पैसे देखील अनेक वाहनचालकांच्या खिशात नसतात, त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मुद्दाम नियम मोडणाऱ्यांवर देखील दंड न आकारता गांधीगिरी करत देखील पोलीस शिस्त लावू शकतात.- आशिष पुजारी