पुणे : गटारीचे पाणी पवित्र अशा नद्यांमध्ये सोडून त्यांचे पाणी प्रदूषित केले आहेच; पण पुलांच्या कठड्यांचा वापर बहुसंख्य पुणेकरांकडून घरातील कचऱ्याची पिशवी, तीसुद्धा प्लास्टिकची नदीमध्ये फेकण्यासाठी केला जातो आहे, त्याकडे सर्व सरकारी यंत्रणांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सुमारे ५ फुटांवरून ही प्लास्टिकची पिशवी पुणेकर भिरकवतात.
पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा अभियंते, क्षेत्रीय कार्यालये यांच्याशी संपर्क साधून, त्यांना निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेट घेत चर्चा करून-करून त्रासून गेल्या. अखेरीस काही संस्थांनी स्वत:च पुलांच्या बरोबर खाली निर्माल्य कलश ठेवले. लोकांनी तेही पळवले आणि कचरा पुलाच्या कठड्यांवरून खाली फेकण्याची सवय कायम ठेवली आहे.
पुणे शहराला जवळपास ४१ किलोमीटर अंतराचा नदीकिनारा लाभला आहे. क्वचितच एखाद्या शहराला अशी जलसमृद्धी मिळते. मात्र दुर्लक्ष होत असल्यामुळे या किनाऱ्यांची शब्दश: वाट लागली आहे. मुळा-मुठा अशा दोन्ही सरिता किनाऱ्याने तर खराब झाल्या आहेतच; आता अशा वरून कचऱ्याच्या पिशव्या पडत असल्याने त्यांचे उरलेसुरले पात्रही खराब झाले आहे. नदीच्या किनाऱ्यांवरून थोडे चालत गेले तरी अशा पिशव्यांचा खर्च पात्रातून वाहताना जागोजागी दिसतो.
घरातील कचरा पिशवीत जमा करायचा, तिचे तोंड बांधायचे व पूल लागला की तिथे कडेला थांबून ही पिशवी नदीत खाली भिरकावून द्यायची. भाजीविक्रेते, लहान टपरीवाले त्यांचा कचरा पोत्यात जमा करतात व रात्री पुलावर येऊन खाली असाच फेकून देतात. कोरेगाव पार्क, बंडगार्डन, मुंढवा, ओकांरेश्वर, संभाजी पूल, लकडी पूल, एसएम जोशी पूल, बालगंधर्व पूल; शहर किंवा उपनगरांमधील एकही पूल असा नाही, की जिथे हा प्रकार होत नाही. याला आळा बसावा यासाठी महापालिकेने पुलांच्या कठड्यांच्या वर उंच अशा लोखंडी जाळ्या बसविल्या. मात्र नागरिक असे हुशार की, या जाळीवरून पिशवी खाली जाईल असा जोर लावूनच ती फेकतात. त्यांच्यावर कोणीही, कसलीही कारवाई करीत नाहीत, त्यामुळे हे प्रकार वाढतच चालले आहेत.
सकाळी व रात्रीच असे प्रकार
सकाळी व रात्री असे प्रकार होतात. त्याचवेळी महापालिकेने तिथे कर्मचारी नियुक्त केले, दंड करण्यास सुरुवात केली तर याला नक्की आळा बसेल. आम्ही वारंवार विनंत्या केल्या, पण काहीच होत नाही. अखेरीस आम्हीच संस्थेच्या वतीने या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प उभे केले व ते यशस्वीपणे सुरू आहेत. औंध गावातील नीलकंठेश्वर मंदिर, ब्रेमेन चौकातील विठ्ठल मंदिर, बोपोडीमध्ये अशा ३ ठिकाणी हे प्रकल्प आहेत. आता चांदणी चौकातील वाकेश्वर मंदिरात सुरू करत आहोत. महापालिकेने किमान असे करावे अशी आमची मागणी असल्याचे जीवित नदी संस्थापक शैलजा देशपांडे यांनी सांगितले.
नागरिकांना सवय लागत नाही
प्रबोधन, प्रशिक्षण यातूनच हे थांबणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, आमचे त्यांना पूर्ण सहकार्य असेल. आमचे प्रयत्न सुरू असतात, मात्र नागरिकांना सवय लागत नाही. घरातील कचरा कमी करण्याचा हा उपाय नाही हे त्यांच्या मनात ठसवायला हवे. दंड किंवा अन्य कारवाई हा अधिकार आमच्या विभागाला नाही. तसे मनुष्यबळही मिळणार नसल्याचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे म्हणाले आहेत.