लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणेकर भाजपच्या कामाला कंटाळले, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत पुण्यात कमबॅक करणार-अरविंद शिंदे
By प्रमोद सरवळे | Updated: March 5, 2024 13:18 IST2024-03-05T12:52:23+5:302024-03-05T13:18:23+5:30
गेल्या दोन वर्षांपासून पालिकांच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार, राज्य सरकारने लवकर जागे व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात

लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणेकर भाजपच्या कामाला कंटाळले, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत पुण्यात कमबॅक करणार-अरविंद शिंदे
पुणे : लोकमत लोकजीबीमध्ये पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी प्रशासकराजवर सडकून टीका केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पालिकांच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार होत आहे. राज्य सरकारने लवकर जागे व्हावे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, पुणे शहरातील नागरिकांच्या कराच्या पैशांचा कसा विनियोग होत आहे, याची पुणेकरांना कल्पनाही नाही. ही लोकशाहीची पायमल्ली आहे. लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्था एकदाही रिक्त ठेवता येत नाही पण दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न मांडायला लोकप्रतिनिधी नाहीत. या मुद्द्यावर आवाज उठवल्यामुळे लोकमत समूहाचे त्यांनी आभार मानले.
लोकसभेला काँग्रेसची तयारी
नागरिकांचा रोष येत्या लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. शहराला एकही चांगला प्रोजेक्ट आला नाही. मेट्रो आम्ही मान्य केले त्यामुळे आज पुणेकर त्याचा लाभ घेते आहे. भाजपच्या काळात झालेल्या कामात मोठी टक्केवारी चालली. सामान्य पुणेकर भाजपच्या कामाला कंटाळले आहेत. त्यामुळे काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पुण्यात कमबॅक करणार. या निवडणुकीची आमची तयारीही पूर्ण झाली आहे, असाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त केली.