पुणे : देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीचे सातवे शहर पुणे ठरले आहे. इतकेच नव्हे; तर वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा क्रमांक विसावा आहे. वाहतूककोंडीने पुणेकर अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार आता पुणे शहरातील वाहतूककोंडीचा अभ्यास मुंबई आयआयटी करणार आहे.
वाहतुकीच्या संथगतीसाठी मोटारींच्या वाढत्या संख्येपेक्षाही खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा अभाव कारणीभूत आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्या वाढल्याने वाहतूककोंडीत भर पडते आणि वाहतूक मंदावते, या सर्वसाधारण मान्यतेला छेद मिळत आहे.
देशात राहण्यासाठी सर्वात सुलभ शहर म्हणून गौरविलेल्या पुणे शहरातील वाहतुकीची स्थिती मात्र गंभीर बनली आहे. पुणेकरांची दररोजची सकाळ आणि सायंकाळ वाहतूककोंडीत जात आहे. साधारणपणे सकाळी ९.३० ते ११ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. अखेर पुणे शहराच्या वाहतूककोंडीचा अभ्यास करण्याचे आदेश राज्य सरकारने आयआयटी मुंबईला दिले आहेत.
अहवाल तयार करण्याच्या सूचना
पुण्यातील वाहतूककोंडीबाबत मंत्रालयातील अधिकारी, आयआयटीचे प्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. त्यात गेल्या पाच वर्षात शहरातील वाहतुकीत काय बदल झाले आहेत. याचा विचार करून पुण्यात येऊन वाहतूककोंडीच्या समस्येचा अभ्यास करावा. त्यासंदर्भातील अहवाल तयार करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
वाहतूककोंडीत पुणे देशात सातवे
पुणे देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीचे सातवे शहर ठरले आहे. इतकेच नव्हे; तर वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा क्रमांक विसावा आहे. पुण्यात ताशी १८ किलोमीटरपेक्षा कमी वाहतुकीचा वेग आहे.