पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

By राजू इनामदार | Published: July 12, 2024 04:30 PM2024-07-12T16:30:09+5:302024-07-12T16:32:35+5:30

शहराध्यक्ष अरविंद शिंदे संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही, माजी पदाधिकाऱ्यांचा आरोप

Pune city appoints new president Former corporators went to Mumbai and wrote a complaint to party leaders | पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

पुणे: काँग्रेसच्या शहर शाखेचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधातील पक्षीय असंतोष उफाळून आला आहे. काही माजी पदाधिकारी, प्रदेश शाखेचे सदस्य तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या विरोधात गुरूवारी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आत या पदावर नवी नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

देशात व राज्यातही काँग्रेसला चांगले वातावरण होते.  सन २०१९ च्या  निवडणुकीतील  साडेतीन  लाख  मतांनी  काँग्रेसचा पराभव झाला होता. तो लीड यावेळी सव्वा ते दीड लाखांनी कमी झाली. यावरून पुण्यातही मतदारांची मानसिकता काँग्रेसला मतदान करण्याची होती हेच दिसते. मात्र ज्या पद्धतीने शहराध्यक्षांनी यंत्रणा, संघटना राबवायला हवी होती ते त्यांनी केलेच नाही. उलट ऐन प्रचाराच्या वेळेस भर बैठकीतून उठून जाणे, पदाधिकाऱ्यांना टाकून बोलणे यासारखे प्रकार केले गेले. त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी बाजूला राहणेच पसंत केले असे तक्रारीत म्हटले आहे.
 
पुणे शहरासारख्या हक्काच्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार पराभूत झाला, याचे कारण शहराध्यक्षांनी संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही असा आरोप करत काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. त्यांची मुदत संपली आहे, त्यांना पदमुक्त करावे व या पदावर नव्या, ताज्या दमाच्या तरूण पदाधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.

चेन्नीथला यांनी त्यांना सांगितले की पक्षशाखेकडे याची माहिती आली. मतभेद, भांडणे नसती तर ही जागा आपल्याला मिळाली असती असेच निवडणूक कालावधीत तिथे गेलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीत नेत्यांचे तसेच निरिक्षक आमदारांचे म्हणणे आहे. पक्षाचे नुकसान होईल अशी कृती कोणीही करू नये. अधिक चौकशी करून लवकरच याबाबतीत आपण योग्य तो निर्णय घेऊ, तो सर्वांनी पाळायला हवा असे त्यांनी सांगितले.

दरम्यान शहराध्यक्ष शिंदे पंढरपूरच्या वारीत आहे. त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईलही डायव्हर्ट करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ते १७ जुलैला पुण्यात येणार आहेत. त्यानंतरच ते याविषयी आपली भूमिका व्यक्त करतील असे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Pune city appoints new president Former corporators went to Mumbai and wrote a complaint to party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.