पुणे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरासाठी एक कोअर कमिटी स्थापन केली. त्यातील नावांवरून इतकी आगपाखड झाली की दुपारी लगेचच त्यात काही नावांचा समावेश करून सुधारीत समिती जाहीर करण्यात आली. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या समितीने सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार व काँग्रेसने केलेली कामे जनआंदोलनाद्वारे मतदारांसमोर आणण्यासाठी काम करायचे आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाच्या डिजीटल सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी या समितीबाबत चर्चा केली. त्यानंतर बुधवारी रात्री समितीची नावे निश्चित करण्यात आली. त्यात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार उल्हासपवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, अरविंद शिंदे, आबा बागूल, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, कमल व्यवहारे, पूजा आनंद, मुक्तार शेख यांचा समावेश होता. ही समिती गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आली.
त्यानंतर लगेचच नाराजांची ओरड सुरू झाली. अपेक्षित नावेच समितीत नाहीत, तेचतेच लोक किती दिवस पहायचे, यांनी तर पक्षाचे नुकसान केले, तेच का आता पुन्हा कोअर कमिटीत अशी एकच राळ उडाली. निष्ठावान पण मागील काही वर्षे शहरातील पक्षीय उपक्रमांपासून फारकत घेतलेल्यांनीही हे असेच सुरू राहणार म्हणून खासगीत टिका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेचच प्रदेशकडून काही नावांचा समावेश करून सुधारीत कोअर कमिटी पाठवण्यात आली. त्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचा मुख्य समन्वयक म्हणून समावेश आहे. त्यानंतर प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक संजय राठोड सहसमन्वयक आहेत. शहराध्यक्ष रमेश बागवे समितीचे अध्यक्ष आहेत, तर मोहन जोशी व व आधाची सर्व नावे सदस्य म्हणून आहेत. आता ही समिती महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काम करणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मागील ५ वर्षे केलेला गैरकारभार चव्हाट्यावर आणणे व त्याचवेळी काँग्रेसने केलेली विकासाची कामे जनतेसमोर आणणे ही या समितीची कार्यकक्षा असल्याचे पक्षाने नमुद केले आहे.