पुणे: शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात तब्बल ५ हजार ७०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. १४ जानेवारीच्या तुलनेत आज शहरातील रुग्णसंख्या तर वाढलीच आहे पण पॉझिटिव्ह रेटही विक्रमी वाढला आहे. आज शहरात १९ हजार १७४ कोरोना चाचण्या झाल्या. शहरातील कोरोनाचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
दिवसभरात रुग्णांना २ हजार ३३८ डिस्चार्ज देण्यात आला. आज पुणे शहरातील २ तर पुण्याबाहेरील ६ रुग्णांचा कोरोनाबाधित मृत्यू झाला. सध्या २०४ कोरोना रुग्णांना ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर २२ आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर २२ रुग्ण आहेत.
आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ५४ हजार १७४ वर गेली आहे. सध्या शहरात पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३१ हजार ९०७ आहे. शहरातील एकूण मृत्यू ९ हजार १३६ झाले आहेत.