शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने शहरात पकडलेली कुत्री ग्रामीण भागातील गावांमध्ये बिनधास्तपणे सोडण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी, कळपाने वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा कळप शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून महापालिका प्रशासनाच्या प्रतापाचा संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, रासे, शेलगाव, भोसे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सदरच्या गावांलगत फॉरेस्टचे क्षेत्र असल्याने पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका हद्दीतून पकडून आणलेली असंख्य कुत्री या परिसरात आणून सोडली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, या कुत्र्यांचा लहान मुले, विद्यार्थी, शेतकरी तसेच शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांकडून अचानकपणे अनेकांना चावे घेतल्याच्या घटना घडत आहेत. रात्री - अपरात्री विचित्र आवाजात भुंकणे व केकाटणे याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
भटकी कुत्री एकमेकांवर हल्ले करत असल्याने त्यांच्या शरीरावर जखमा होत आहेत. परिणामी जखमी कुत्र्यांना रॅबीजसारखे भयानक रोगही होऊ शकतात. त्यामुळे जखमी रोगाने ग्रासलेली कुत्री माणसाला चावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी यावर प्रतिबंधनात्मक उपाय योजना आखण्याची मागणी सयाजीराजे मोहिते, मयूर मोहिते, श्रीनाथ लांडे, शरद मोहिते, संतोष आवटे, रंजित हांडे, दिगंबर लोणारी, गणेश दळवी, वामन लांडे, नवनाथ म्हाबरे, सतीश गुजर आदींनी केली आहे.