भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघ आहेत. सन १९५१ मध्ये ही संख्या केवळ १३ होती. त्यावेळी पुणे शहरात ४ मतदारसंघ होते. पुणे शहर विस्तारले आणि लोकसंख्याही वाढत गेली, तसतसे मतदारसंघ देखील वाढले. मतदारसंघांची नावेही बदलली. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर असलेली मतदारसंघांची २१ ही संख्या अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा घेतलेला रंजक आढावा.
नितीन चौधरी
पुणे : स्वातंत्र्यानंतर विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ मध्ये झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली नव्हती. तत्कालिन मुंबई प्रांतात पुणे जिल्ह्याचा समावेश होता. त्यानुसार जिल्ह्यात केवळ १३ मतदारसंघ होते. त्यात पुणे शहरात उत्तर पश्चिम, मध्य, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम असे चारच मतदारसंघ होते. जिल्ह्यात हवेली दौंड, शिरुर, बारामती, मावळ उत्तर मुळशी, आंबेगाव, भोर-वेल्हे-दक्षिण मुळशी, खेड, पुरंदर व जुन्नर असे केवळ ८ मतदारसंघ, असे एकूण १३ मतदारसंघ होते. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक होणे अपेक्षित असताना सहा वर्षांनी अर्थात १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील सर्व चारही मतदारसंघाची नावे बदलण्यात आली. त्यानुसार कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शुक्रवार पेठ हे मतदारसंघ तयार झाले.
ग्रामीण भागातील बारामती, आंबेगाव, खेड व पुरंदर हे मतदारसंघ कायम राहून इंदापूर, हवेली, जुन्नर, शिरुर, मावळ व भोर हे मतदारसंघ नव्याने तयार झाले. त्यात १९५१ च्या तुलनेत एका मतदारसंघाची वाढ होऊन एकूण मतदारसंघ १४ झाले. मुंबई प्रांतातून गुजरात वगळल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; मात्र त्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक १९६२ मध्ये घेण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघाची वाढ होऊन एकूण मतदारसंघ १६ झाले. त्यात शहरात व ग्रामीण भागात प्रत्येकी एका मतदारसंघाची भर पडली.
शहरातील कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट व शुक्रवार पेठ या मतदारसंघांत खडकी मतदारसंघ वाढला. तर ग्रामीण भागात दौंड मतदारसंघाची भर पडून बारामती, आंबेगाव, खेड, पुरंदर, इंदापूर, हवेली, जुन्नर, शिरुर, मावळ व भोर असे मतदारसंघ निर्माण करण्यात आले. त्यानंतर १९६७ मध्ये जिल्ह्यातील एकूण मतदारसंघांमध्ये पुन्हा एका मतदारसंघाची वाढ होऊन ही संख्या १७ झाली. शहरातील मतदारसंघांची संख्या कायम राहिली तरी खडकीऐवजी भवानीपेठ मतदारसंघ तयार झाला. तर कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट व शुक्रवार पेठ हे मतदारसंघ कायम राहिले. ग्रामीण भागात मुळशी मतदारसंघाची भर पडली. खेडऐवजी खेड आळंदी असा मतदारसंघ तयार करण्यात आला. अन्य बारामती, आंबेगाव, पुरंदर, इंदापूर, हवेली, जुन्नर, शिरुर, मावळ व भोर हे मतदारसंघ कायम राहिले.
राज्यात १९७२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत जिल्ह्यातील गेल्या वेळच्या अर्थात १९६७ च्या निवडणुकीतील मतदारसंघांची संख्या व नावे कायम राहिली. राज्याच्या निर्मितीनंतर दुसऱ्यांदा पाच वर्षांनी निवडणूक होण्याऐवजी सहा वर्षांनी अर्थात १९७८ मध्ये निवडणूक झाली. त्यात जिल्ह्यात आणखी एक मतदारसंघ वाढला. तोदेखील केवळ शहरातच वाढला. कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट व भवानी पेठ हे मतदारसंघ कायम राहून शुक्रवार पेठऐवजी पर्वती व बोपोडी हे नवे मतदारसंघ निर्माण करण्यात आले. ग्रामीण भागातील बारामती, आंबेगाव, खेड, पुरंदर, इंदापूर, हवेली, जुन्नर, शिरुर, मावळ, मुळशी व भोर हे सर्व ११ मतदारसंघ पूर्वीच्या निवडणुकीतील कायम राहिले. त्यानंतर झालेल्या १९८०, १९८५, १९९०, १९९५, १९९९ व २००४ या सार्वत्रिक निवडणुकांतही जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ कायम ठेवण्यात आले होते.
अन् मतदारसंघांची संख्या १८ वरून २१ झाली
लोकसंख्या वाढल्याने २००९ मध्ये राज्यातील सर्वच ठिकाणी मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या १८ वरून २१ झाली. त्यात शहरात आणखी दोन मतदारसंघांची भर पडली. शिवाजीनगर, पर्वती, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट हे चार मतदारसंघ कायम राहून बोपोडी व भवानी पेठऐवजी वडगाव शेरी, कोथरुड, खडकवासला, हडपसर हे चार मतदारसंघ तयार करण्यात आले. आतापर्यंत पिंपरी शहरासाठी स्वतंत्र मतदारसंघ नसताना या शहरात पिंपरी, भोसरी व चिंचवड असे तीन मतदारसंघ तयार करण्यात आले. ग्रामीण भागासाठी १० मतदारसंघ कायम ठेवण्यात आले. त्यात मुळशी व हवेली हे मतदारसंघ रद्द करण्यात आले आणि बारामती, आंबेगाव, खेड, पुरंदर, इंदापूर, हवेली, जुन्नर, शिरुर, मावळ व भोर हे मतदारसंघ राहिले. त्यानंतर झालेल्या २०१४, २०१९ व सध्या होऊ घातलेल्या २०२४ च्या निवडणुकीतही मतदारसंघांची संख्या व नावे तीच ठेवण्यात आली आहेत.