पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे रात्री थंडीचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात झाली आहे. दिवसाचे घटलेले तापमान व ढगाळ वातावरण, यामुळे ही थंडी वाढल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. पुढील पाच दिवस कमाल तापमान ३० अंशांच्या खाली राहणार असून, थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील किमान तापमान दोनदा जवळपास २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. कमाल तापमानही २६ ते २७ अंशांपर्यंत उतरले. शहरात १६ सप्टेंबर रोजी कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दि. १७ व १९ तारखेला किमान तापमान २० अंशांपर्यंत उतरले होते. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. किमान तापमान हे सरासरी इतके असले, तरी कमाल तापमान सरासरीच्या ३ ते ५ अशांनी घसरले आहे.
याबाबत हवामान विभागातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. ढगाळ वातावरणामुळे अशी परिस्थिती काही दिवस राहते. त्यामुळे एकूण उष्णता कमी होते, ज्यामुळे किमान तापमानातही थोडीशी घट होऊ शकते.”
साधारणपणे, दोन दिवस रात्रीच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होते, परंतु जेव्हा दिवसाचे तापमान अधिक कालावधीसाठी उतरते, तेव्हा त्याचा परिणाम किमान तापमानावरही दिसून येतो. पुढील काही दिवस शहरात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. २६ सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान ३० अंशांच्या खाली राहील. त्यानंतर, हळूहळू त्यात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे.