राहुल शिंदे
पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्थांकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्गांसाठी प्रवेश दिला जात आहे.एमआयटीमधील विद्यार्थ्यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला होता. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.
एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले, एमआयटीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता. एका कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात 25 विद्यार्थी आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहेत. आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चार विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यात एकही विद्यार्थी ओमायक्रॉनचा नाही. विद्यापीठाच्या एका कोप-यात वर्कशॉपमध्ये विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क आलेला नाही. तसेच एमआयटी प्रशासनाकडून कोरोना विषयक काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी यामुळे पूर्ण कॅम्पस बंद करण्याचे कारण सध्या तरी समोर दिसत नाही.शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.विद्यापीठाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.