पुणे : गरोदर महिला असल्याचे भासवून पोटामध्ये लपवून दारूच्या बाटल्या आणणे किंवा दारूचे फुगे टायरमध्ये घालून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे अनेक प्रकार पूर्वीच्या चित्रपटांमधून आपण पाहिले असतील; परंतु पुण्यामध्ये हे सर्व करण्याची गरजच नाही. कारण, पोलिसांची पूर्ण डोळेझाक आणि उत्पादनशुल्क विभागाकडे माहिती असूनही कारवाईसाठी केली जाणारी टाळाटाळ यांमुळे पुण्यात गावठी दारूची आयात वाढली आहे.पुणे शहर हे सध्या गावठी दारूच्या आयातीचे मोठे केंद्र बनले आहे. पूर्वी अगदी शहरातील बावधन, सूस रोड, पाषाण, वडारवाडी, येरवडा, भाटनगर भागातच तयार होत असे़ मोठ्या गटाराच्या चेंबरच्या कडेने मिश्रण केलेला माल ठेवला जायचा़ तो कुजला, की त्यापासून दारू तयार केली जात असे; पण आता वस्ती वाढल्याने शहरामध्ये दारूच्या भट्ट्यांसाठी जागा मिळत नाही; तसेच आर्थिक दृष्ट्या परवडतही नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी दारूच्या भट्ट्या तयार करण्याचा व्यवसाय फोफावला आहे. पुणे शहराच्या भोवती असणाऱ्या हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, शिंदवणे, फुरसुंगी, चाकण, वेल्ह्याचा दुर्गम भाग, भोर तालुका येथे दारूच्या हातभट्ट्या आहेत. येथे तयार झालेली ही दारू साधारण ३५ लिटरच्या कॅनमधून मोटारीतून शहरात आणली जाते़ दारूची वाहतूक होत असताना, मोठ्या प्रमाणावर वास येतो; पण तो पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाचे नाक दारूधंदेवाल्यांकडून दिलेल्या हप्त्याने बंद असते. त्यामुळे ग्रामीण भागात तयार झालेली ही दारू शहरात येणाऱ्या सर्वच मोठ्या रस्त्यांवरून सहजपणे पुण्यात येते. सोलापूर रोड परिसरातील नदीकाठी तयार होणारी दारू थेट सोलापूर रोडने फुरसुंगी, हडपसर परिसरात येते़ शहरात या गाड्या नियमितपणे येत असल्या, तरी त्यांचे मार्ग कायम वेगवेगळे असतात़ आज आलेल्या मार्गानेच उद्या त्या गाड्या येतीलच, असे नाही़ अनेकदा शहरात; तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नाकाबंदी केलेली असते़ असे असले, तरी दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या या गाड्या पकडल्या कशा जात नाही, असा प्रश्न कोणालाही पडेल़ त्यातच त्यांच्या ‘नेटवर्क’चे कसब असते़ या गाड्या प्रामुख्याने पहाटेच्या वेळी शहरात येतात़ ज्या वेळी पोलिसांचा बंदोबस्त सैल झालेला असतो किंवा तो संपण्याची वेळ आलेली असते़ अशाच वेळी त्यांची वाहतूक केली जाते़ त्याचबरोबर पोलीस दलातही या वाहतूक करणाऱ्यांचे खबरे असतात़ ते त्याची माहिती वेळोवेळी देत असतात़ त्यामुळे शहरात कितीही बंदोबस्त असला, तरी त्यातून या गाड्या बरोबर निसटून आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात़ गावठी दारूच्या वाहतुकीसाठी वेगळी यंत्रणा असते. प्रामुख्याने १० ते २० हजार रुपयांमध्ये सहजपणे मिळणाऱ्या गाड्यांचा वापर त्यासाठी केला जातो. या गाड्या इतक्या जुन्या असतात, की कधी कोणी चुकून अडविले, तर जागेवरच गाडी सोडून पळून जातात़ अशा जुन्या गाड्यांचे मालक शोधणे पोलिसांच्या दृष्टीने अवघड असते़ उत्पादन शुल्क विभागाकडून दारूभट्ट्यांवर कारवाई करून, त्या उद्ध्वस्त केल्याचे अनेक वेळा कळविले जाते; मात्र शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दारू येत असताना, वाहतूक करताना दारू पकडली आहे, हे अभावानेच दिसते.
पुणे गावठी दारूच्या आयातीचे केंद्र
By admin | Published: July 22, 2015 3:04 AM