खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

By निलेश राऊत | Published: December 20, 2023 04:24 PM2023-12-20T16:24:00+5:302023-12-20T16:24:27+5:30

जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, राष्ट्रवादीचा आरोप

Pune City NCP protest against suspension of MP Supriya Sule, Dr. Amol Kolhe | खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) बुधवारी वारजे उड्डाण पुलाखाली आंदोलन करण्यात आले.

एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून “महासंसदरत्न” पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, म्हणजेच संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी शेतकऱ्यांच्या हक्कांविषयी आवाज उठवणारे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निलंबित करून मोदी सरकारने हुकूमशाहीचा प्रत्यय दिला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास वेदनादायी असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संसदेचा हा घोर अपमान असल्याचे जगताप म्हणाले.

या आंदोलनात माजी नगरसेवक काका चव्हाण, स्वप्नील दुधाणे, डॉ. सुनील जगताप, गिरीश गुरणानी, किशोर कांबळे, मनाली भिलारे, शरद दबडे, सुरेश गुजर, ज्योती सूर्यवंशी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pune City NCP protest against suspension of MP Supriya Sule, Dr. Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.