पुणे: शहरातील महत्वाच्या विषयावर शहराध्यक्षांना कसलीही कल्पना न देता पक्षाचीच भूमिका असल्यासारखे पत्रक काढण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यभागात नव्या बांधकामांना दीड ऐवजी दोन असा चटई क्षेत्र निदेर्शांक (एफएसआय) देण्याबाबत माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर येत असून त्यातून पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.रमेश बागवे म्हणाले, बालगुडे माजी नगरसेवक आहेत, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारीही आहेत. त्यांनी पत्रक प्रसिद्ध करण्यापुर्वी याविषयाची किमान कल्पना तरी शहराध्यक्ष म्हणून द्यायला हवी. हा महत्वाचा विषय आहे. शहराच्या मध्यभागातील पेठांमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या काही लाख नागरिकांशी तो संबधित आहे. त्याचबरोबर त्यात बांधकाम व्यावसायिक, अन्य काही मुद्देही आहेत. इतका महत्वाचा विषय शहराध्यक्षांना अंधारात ठेवून प्रसिद्ध करणे योग्य नाही. पक्षशिस्तीत ते बसत नाही. एकट्या बालगुडे यांच्याकडून या विषयाचा पाठपुरावा होणार आहे का? त्यांना पक्षाची ताकद लागणार नाही का? ते एकटे सरकारकडे गेले तर या विषयात काही निर्णय होईल का? या सर्व प्रश्नांनी उत्तरे नकारार्थी आहेत. तरीही त्यांनी असे का करावे हा त्याचा प्रश्न आहे, मात्र शहराध्यक्ष म्हणून ते मान्य नाही.असे विषय पक्षाकडून मांडले गेले तर त्याला वजन येते हे बालगुडे यांना माहिती नाही असे कसे म्हणता येईल असे प्रश्न करून बागवे म्हणाले, अलीकडे पक्षात प्रत्येकजणच मोठा पदाधिकारी व थेट वरिष्ठ नेत्यांबरोबर संबध असलेला असा होऊ लागला आहे. त्यातूनच मग एकाच विषयावर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळी आंदोलने असे होत आहे. या सगळ्यातून पक्षाचे नुकसानच होत आहे.
महापालिकेची निवडणूक दोन वर्षावर आली असताना पक्षाला सशक्त करायचे सोडून असे प्रकार होत असतील तर त्याला आळा घालणे शहराध्यक्ष म्हणून माझे कामच आहे. त्यामुळे यासंबधी लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवणार आहे.बालगुडे यांनी मात्र ही पक्षाचीच भुमिका असल्याचे सांगितले. वैयक्तिक भूमिका घ्यायला मी काही बांधकाम व्यावसायिक नाही, किंवा त्यांच्यातील कोणी माझे मित्रही नाही. सन २००७ च्या विकास आराखड्यापासून हा विषय आहे. सन २०१५ मध्ये त्यावर पक्षाने हीच भूमिका घेतली होती. आताच्या अध्यक्षांनाही ते माहिती आहे. त्यामुळेच रस्त्यांची रुंदी सहा मिटर की नऊ मिटर या वादाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रक प्रसिद्ध केले असे बालगुडे म्हणाले. अध्यक्ष म्हणून त्यांना सांगायला हवे होते, मात्र त्यात पशशिस्तभंग होण्यासारखे काहीही नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. .....पक्षप्रमुखांशी बोललेच पाहिजेपक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, पक्षात काही गोष्टी चुकीच्या होत आहेत हे मान्य करायचा हवे. मला रस्तारुंदीच्या प्रश्नावर पत्र काढायचे होते. मी शहराध्यक्षांबरोबर बोललो, त्यांना विषय सांगितला व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्याचे मला उत्तरही आले. पक्षशिस्त म्हणून काही असते, तेच पाळले जात नाही. अशा मोठ्या विषयांवर पक्षातंर्गत चर्चा व्हायला हव्यात व नंतरच मत किंवा भूमिका जाहीर व्हायला हवी. तेच योग्य व पक्षहिताचे आहे हे आता सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.