पुणे : शहर आस्थापनेवरील पाेलिस शिपाई व चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया मंगळवारी (दि. ३) शिवाजीनगर मुख्यालयात सुरू झाली. पाेलिस शिपाई चालकपदासाठी दि. ३ ते १७ जानेवारी या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर पाेलिस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू हाेणार आहे. पाेलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षेखाली भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडणार असून, दक्षता समितीही नेमली आहे. त्यामध्ये पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पाेलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पाेलिस उपायुक्त आर. राजा आणि परिमंडळ-१ चे पाेलिस उपआयुक्त संदीपसिंह गिल्ल यांचा समावेश आहे.
उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील नमूद सूचनांचे पालन करीत दिलेल्या तारखेस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे. उमेदवार नमूद तारखेस उपस्थित राहू शकला नाही तर त्यास तारीख बदलून दिली जाणार नाही, अथवा पुन्हा संधी दिली जाणार नाही. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी येत असताना आवेदन अर्जाच्या व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित झेराॅक्स प्रतींचे दाेन संच साेबत आणावेत.
उमेदवारांनी भूलथापांना बळी पडू नये
उमेदवारांनी भरतीसाठी काेणाच्याही आमिषाला बळी पडू नये. जर काेणी व्यक्ती भरती करून देण्यासाठी आमिष दाखवीत असेल तर तत्काळ संबंधित व्यक्तीबाबत दक्षता अधिकारी यांना संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पाेलिस आयुक्त रितेशकुमार यांनी केले आहे.