पुणे : पुणे शहर विद्येचे माहेरघर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे पब संस्कृती फाेफावत आहे. यामुळे पुण्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे. तसेच अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन आणि त्यामुळे होणारे अपघात चिंतेचा विषय बनत आहे. हे राेखण्यासाठी पुण्यातील पबवर अत्यंत कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे, असे निवेदन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले.
कल्याणीनगर येथील अपघातात दोन संगणक अभियंता प्राणास मुकले आणि पबचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याबाबत सोमवारी भाजपचे मुरलीधर मोहोळ, हर्षदा फरांदे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, प्रदीप देशमुख, लतीफ शेख, रूपाली पाटील, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, राहुल भंडारे व इतर महायुतीचे पदाधिकारी यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
या दुर्घटनेसंदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली? याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घेतली. पुण्यातील वाढत्या पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.