पुणे : स्वच्छ भारत मिशन (Swachh Survekshan 2021) अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ स्पर्धेत, पुणे शहराने पुन्हा एकदा झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात, पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर १७ व्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून ‘स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत’, देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी शनिवारी (दि़२०) जाहीर करण्यात आली़. यामध्ये यावर्षीही इंदोर शहराने प्रथम क्रमांक मिळविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा व चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई यांनी स्थान पटकावले आहे़.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला देशातील ४ हजार ३२० शहरांमध्ये दहाव्या क्रमांकाचे तर १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकाचे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक़ुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उप आयुक्त अनिल देशमुख, स्वच्छ सर्वेक्षण उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़ केतकी घाटगे यांनी हा सन्मान, नगरविकास मंत्रालयाचे सचिव महुआ यांच्याकडून स्विकारला़ यावेळी पुण्याला राहण्यास उत्तम शहर (बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी) या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक व सीएफसी अंतर्गत थ्री स्टार मानांकनाने गौरविण्यात आले.
कोविड काळामध्ये पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था यांचे सांगीतिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव, यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असून, यापुढील काळातही लोकसहभागातून उत्तरोत्तर प्रयत्न करणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे़ तर लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, स्वच्छ संस्था, सिटीझम फोरम पुणेकर, यांचे या स्पर्धेत मोलाचा सहभाग मिळाला असल्याचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले. व्यवस्थापन करणाऱ्यांसह समस्त पुणेकरांचे हे श्रेय-
पुणे शहराला मिळालेले सर्वच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकीकडे कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे शहराच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देऊन, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करता आली याचे समाधान आहे. 'बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी'मध्ये आपल्या पुणे शहराने बाजी मारली. यात पुण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी पुणे शहराला एकूणच स्वच्छतेमध्ये १७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा यात मोठ्या सुधारणेसह देशात ५ वे स्थान प्राप्त झाले. शहर स्वच्छतेसाठी राबवणाऱ्या, व्यवस्थापन करणाऱ्यांसह समस्त पुणेकरांचे हे श्रेय आहे़. - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे़