पुणे : मध्यंतरी शिवसेनेत शिथिलता आली होती. मात्र आता सगळी मरगळ झटकून नव्याने कामास सुरूवात करत आहोत असे सांगत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी पुणे शहर शिवसेनेची तब्बल ५१५ जणांचा समावेश असलेली महाजंबो कार्यकारिणी जाहीर केली. यात प्रथमच शहरातील शाखाप्रमुखांचाही समावेश करण्यात आला आहे.शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी ही माहिती दिली. दुसरे शहरप्रमुख माजी आमदार महादेव बाबर काही कारणामुळे यावेळी उपस्थित नव्हते. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले तसेच नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर व अन्य महिला तसेच शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.माजी नगरसेवक प्रशांत बधे, सनी निम्हण, शाम देशपांडे, योगेश मोकाटे व शिवसेनेच्या अनेक नव्याजुन्या पदाधिकाºयांना या कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे. शहर सांस्कृतिक प्रमुख म्हणून सुनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क प्रमुख उदय सामंत यांच्या संमतीने ही कार्यकारिणी जाहीर करत असल्याचे मोकाटे यांनी सांगितले. मोकाटे यांच्याकडे कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, व खडकवासला असे चार व बाबर यांच्याकडे हडपसर, वडगाव शेरी, पर्वती व कॅन्टोन्मेट असे चार विधानसभा मतदार संघ देण्यात आले आहेत.शहर स्तरावर २ शहरप्रमुख, २ महिला आघाडी प्रमुख, १ पुणे शहर सांस्कृतिक प्रमुख, ४ सहसंपर्क प्रमुख, ८ उपशहरप्रमुख, १० शहर संघटक, ८ विधानसभा क्षेत्र प्रमुख, ११ शहर समन्वयक अशी ४६ जणांची प्रमुख कार्यकारिणी आहे. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपशहर प्रमुख, शहर संघटक, महिला आघाडी संघटक, शहर समन्वयक, मतदार संघ निरीक्षक, तीन विभागप्रमुख, प्रसिद्धी प्रमुख अशी पदे आहेत. त्यानुसार १६ विधानसभा क्षेत्र समन्वयक, ८ मतदार संघ निरीक्षक, २७ विभागप्रमुख, १५२ उपविभागप्रमुख, ४८ प्रभाग प्रमुख, २६४ शाखा प्रमुख अशी एकूण ५१५ जणांची महाजंबो कार्यकारिणी मोकाटे यांनी जाहीर केली.शाखेच्या वतीने सुरू असणारे विविध लोकोपयोगी उपक्रम ही शिवसेनेची शक्ती आहे. मध्यंतरी ते थांबले होते, मात्र आता त्याला पुन्हा सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेची संघटना असेल. रिक्षासेना, वाहतूक सेना, चित्रपटसेना, माथाडी कामगार सेना अशा सर्वच क्षेत्रात शिवसेना प्रवेश करणार आहे. संघटना होत्याच पण त्यांची सक्रियता थांबली होती, ती सुरू करणार आहोत असे मोकाटे यांनी सांगितले. समाजपयोगी कामांमधून शिवसेनेचा विस्तार हे संघटनेचे मूळ ध्येयच राबवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
५१५ जणांसह शाखा प्रमुखांचाही समावेश असलेली पुणे शहर शिवसेना जंबो कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:01 PM
शिवसेनेत शिथिलता आली होती. मात्र आता सगळी मरगळ झटकून नव्याने कामास सुरूवात करत आहोत असे सांगत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी पुणे शहर शिवसेनेची तब्बल ५१५ जणांचा समावेश असलेली महाजंबो कार्यकारिणी जाहीर केली.
ठळक मुद्देपुणे शहर शिवसेनेची तब्बल ५१५ जणांचा समावेश असलेली महाजंबो कार्यकारिणी जाहीरसंघटना होत्याच पण त्यांची सक्रियता थांबली होती, ती सुरू करणार : चंद्रकांत मोकाटे