किरण शिंदे
पुणे: पुणे शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडताना दिसतायात. शहराच्या प्रत्येक भागात खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाना पठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्यने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा गोळीबाराने पुणे शहर हादरले आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला.
दिलीप गायकवाड असं गोळीबार झालेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसरातील साळवे नगर मध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन ते तीन हल्लेखोर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जखमी झालेल्या दिलीप गायकवाड यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लीखोरांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.